बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! करोनाकाळात लाखोंची उलाढाल, १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर

हायलाइट्स:

  • बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल!
  • करोनाकाळात लाखोंची उलाढाल
  • १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर

चंद्रपूर : चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेत १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर झाल्या. चिनी राख्यांना पर्याय म्हणून त्यांनी बांबूच्या राख्यांची निर्मिती केली आहे. या राख्यांना पुणे, मुंबईसह राज्यातूनच नव्हे तर विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या राख्यांनी ‘ग्लोबल’ बाजार व्यापला आहेत. करोनाच्या संकटकाळातही या उद्योगाने लाखोची उलाढाल केली आहे.

बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिक व खासगी क्षेत्रात बांबू लागवड व योग्य व्यवस्थापन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत सामूहिक उपयोगिता केंद्र आहे. ते चंद्रपूर, विसापूर, पोंभुर्णा, मुल, चिमूर व चिचपल्ली येथे असून या केंद्रात महिला काम करतात. २०१७ पासून येथे प्रत्यक्षात प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला. त्यातून आतापर्यंत १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. या प्रशिक्षणानंतर आपले घर काम सांभाळून फावल्या वेळात सदर महिला बांबूपासून विविध हस्तकलेच्या निरनिराळ्या वस्तू तयार करतात. या सर्व बांबू हस्तकलेच्या वस्तूंची विक्री संस्थेचा माध्यमातून केली जाते. त्यातून त्या महिलांना सन्मानजनक रोजगार प्राप्त होतोय असे चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक के. एम. अभर्णा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

बांबूपासून निर्मित पर्यावरण पूरक राखी ही यातीलच एक प्रयोग, ग्रामीण भागातील एक हजार गरीब व गरजू महिलांना या प्रशिक्षणाद्वारे शाश्वत उपजीविकेचे साधन निर्मितीच्या उदेशाने बीआरटीसी व माविम हे शासकीय महामंडळ करारबद्ध झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रक्षाबंधनाकरीता सदर प्रशिक्षित महिलांनी पर्यावरण पूरक सुंदर आकर्षक बांबू राख्या तयार केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या करोना महामारीच्या काळातही घरात आपले घर काम करून बनविलेल्या पर्यावरणपूरक बांबू राख्या या चिनी राख्यांना पर्याय म्हणून बाजारपेठेत उपलब्ध आहेत. १० ते २० रुपये प्रती दराने राख्या विकल्या जात आहेत.

स्वीडन, अमेरिकेत मागणी

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे प्रशिक्षित महिलांच्या उत्पादनाला ‘मार्केट’ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. येथून मीनाक्षी मुकेश वाळके हिने २०१९ मध्ये सदर प्रशिक्षण पूर्ण केले. तिने स्वतः अव्वल दर्जाच्या राख्यांची निर्मिती करीत येथील महिलांच्या देखील राख्यांना ‘ग्लोबल’ करण्यात मोठा वाटा उचलला आहे. स्वीडन, अमेरिकेसह विविध देशात या राख्या पोहचल्या आहेत.

दिव्यांगांना दिला आधार

पर्यावरण स्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून स्थानिक बाबूपेठ परिसरातील १२ दिव्यांग महिला व पुरुषांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू राखी बनविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे ‘बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस’ चे संचालक व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष नीलेश पाझारे यांच्या संकल्पनेतून सदर सामाजिक उदयमाची मुहूर्तमेढ झाली. दिव्यांगाना जांभर्ला स्थित बांबूटेकच्या कार्यशाळेत राखी निर्मिती तसेच हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.

महिन्याला दीड लाखांची विक्री

या केंद्रातून आतापर्यंत बांबूपासून सायकल, तिरंगी झेंडा, बांबूची तलवार, बांबूपासून तयार झालेले सोफासेट, खुर्च्या, टेबल याशिवाय या केंद्राची सुप्रसिद्ध बांबूची कव्हर असणारी डायरी देखील प्रसिद्ध आहे. या वस्तूंची महिन्याला सुमारे दीड लाख रुपयांची विक्री केली जाते.

राख्यांची विक्री

वर्षे संख्या

२०१९ : ३०,०००

२०२० : २५,०००

२०२१ : २५,०००

Source link

bamboo rakhirakhi imagesrakhi makingrakhi making ideasRaksha Bandhanraksha bandhan 2021raksha bandhan quotesrakshabandhan quotes for brotherrakshabandhan quotes in marathi
Comments (0)
Add Comment