पुणे जिल्हा परिषदेमध्ये १ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरतीसाठी तब्बल ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या आकडा थक्क करणारा आहे. या अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला ६ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील २१ पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.
या भरतीसाठी सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) या पदासाठी आले आहेत. या पदाच्या एकूण १२४ जागा असून, त्यासाठी २८ हजार २०९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सर्वाधिक म्हणजेच ४३६ जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) या पदासाठी ३ हजार ९३० अर्ज आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ३७ जागांसाठी ४ हजार ५७५ उमेदवारांनी, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या १२८ जागांसाठी २ हजार ८९८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. औषध निर्माण अधिकारी पदाच्या २५ जागांसाठी ५ हजार ५७३ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी १ हजार ४०५ अर्ज आले आहेत.
(वाचा: MPSC Exam News: ‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय..)
विस्तार अधिकारी (पंचायत) ३ जागांसाठी १ हजार ७८४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ जागासाठी ८१९, विस्तार अधिकारी (कृषी) २ जागांसाठी १९३, विस्तार अधिकारी (शिक्षण) २ जागांसाठी १४४, वरिष्ठ सहायकाच्या ८ जागांसाठी ५ हजार ३१, पशुधन पर्यवेक्षकच्या ३० जागांसाठी ४६३, कनिष्ठ आरेखकच्या २ जागांसाठी ६८, कनिष्ठ लेखा अधिकारी एका जागेसाठी २१३ अर्ज आले आहेत. या अर्जाची छाननी होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता एकाहून अधिक जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केला असल्यास तो बाद ठरू शकतो. कारण या परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास तसेच त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्याचे इतर अर्ज बाद होणार आहेत.
(वाचा: BEL Recruitment 2023: ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..)