उच्च व तंत्र शिक्षण विभागाने (Higher And Technical Education Department) यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आता पुन्हा एकदा राज्यातील विद्यापीठांना निर्देशित केले आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची इंग्रजी क्रमिक पुस्तके तात्काळ मराठीत भाषांतरित करण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या आणि येत्या पंधरा दिवसांत प्रत्येकी दहा क्रमिक पुस्तके मराठी भाषांतरित करावी असे सूचित करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी मध्ये उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
(वाचा: MPSC Exam News: ‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय..)
अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याबाबत मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात ५ जानेवारी २०२३ रोजी सामंजस्य करार झाला. या करारानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखांमधील सर्व इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तके आयआयटी मुंबई यांच्याकडून उडान प्रकल्पांतर्गत भाषांतरित करून घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना दिल्या होत्या. या निर्णया नंतर तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना वारंवार सूचना देखील केली होती. परंतु विद्यापीठांकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले.
नुकतीच या संदर्भात उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांसोबत एक आढावा बैठक घेतली. बैठकीत क्रमिक पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याच्या प्रकल्पाचा लेखाजोखा घेण्यात आला. परंतु विद्यापीठांनी पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास आले. म्हणून आत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांना सक्त ताकीद दिली आहे.
राज्यातील तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची क्रमिक पुस्तके मराठीत भाषांतरित झाली आहेत. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके भाषांतरित करण्याचे काम सुरू आहे. परंतु विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखेतील क्रमिक पुस्तके तत्काळ इंग्रजीतून मराठीत भाषांतर करावी, अशा सूचना सर्व विद्यापीठांना यापूर्वीच दिल्या होत्या. तरीही विद्यापीठांनी त्याबाबत फारशी सक्रिय भूमिका घेतली नाही. म्हणूनच आता सप्टेंबर अखेर पर्यंत सर्व पुस्तके मराठी भाषांतरित झाली पाहिजेत असे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
(वाचा: Pune ZP Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषद भरती होणार चुरशीची… १ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..)