हायलाइट्स:
- भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल
- नारायण राणे यांच्यावरही केली जोरदार टीका
- नारायण राणेंना हे कळायला हवं होतं – राष्ट्रवादी काँग्रेस
वसई: ‘कोविड संसर्गाच्या काळात जनआशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे नारायण राणे यांना कळायला हवं होतं. ते अमित शाह किंवा जे. पी. नड्डा यांना तसं सांगू शकले असते. परंतु पब्लिसिटी स्टंटचा मोह राणेंना आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी लोकांचं आरोग्य वेठीस धरलं आहे,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. (NCP Attacks Narayan Rane)
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २१ ऑगस्टपासून पत्रकार परिषदांचं आयोजन केलं आहे. पहिली पत्रकार परिषद वसई येथे पार पडली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘आपलं अपयश झाकण्यासाठी आणि लोकांचं लक्ष केंद्र सरकारच्या अपयशापासून इतरत्र वळवण्यासाठी हे भाजपचे प्रयत्न आहेत. पेट्रोल, डिझेल व स्वंयपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ झालीय. त्यामुळं महागाई वाढलीय. परंतु सात वर्षांत जे काम केलंच नाही, ते केलं म्हणून सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा संताप क्रास्टो यांनी व्यक्त केला.
वाचा: ‘फाळणीसाठी फक्त गांधी, नेहरू, काँग्रेसला जबाबदार धरले जाते कारण…’
‘राज्यात महाविकास आघाडी सरकारनं कोविडच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवलं. आता जास्त काळजी घेण्याचा काळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याचा हा काळ आहे. त्यावेळी गर्दी करून कसं चालेल. राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषविली आहेत. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. मात्र कोविड प्रादुर्भावाच्या काळात अशा प्रकारची यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे त्यांना कळायला हवं होतं, असं क्रास्टो म्हणाले.
वाचा: अफगाणिस्तानात नेमकं काय घडलं?; वाचा मटा संवादमध्ये
‘कोविडच्या दुसऱ्या लाटेचे दूरगामी परिणाम देशावर झाले आहेत. तेव्हाही ICMR, WHO, टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला इशारा देऊन सावध करत होते. सोशल डिस्टन्सिंग बाळगा, मास्क लावा याबद्दल आवर्जून सांगत होते. मात्र त्या कालखंडात भाजपनं निवडणुका लादल्या, गर्दीच्या समारंभांना परवानग्या दिल्या. त्याचे भीषण परिणाम दुसर्या लाटेच्या रूपानं पाहायला मिळाले. भाजपशासित राज्यांमध्ये आणि वाराणसीच्या घाटावर एकावेळी २५ ते ३० मृतदेहांना अग्नी दिला जात होता. मृतदेह नदीत वाहून जाताना दिसत होते. ते पाहून देश हादरून गेला. मात्र भाजपकडून सारं काही आटोक्यात असल्याचं भासवलं जात होतं. अपयश झाकण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या भाजपा नेत्यांकडून आखल्या जात आहेत. लोकांनी भाजपच्या या दिखाव्याच्या राजकारणात अडकू नये, असं आवाहन क्रास्टो यांनी केलं.