हायलाइट्स:
- फाळणीचा दिवस वेदना स्मृतिदिन म्हणून पाळण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
- आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? – संजय राऊत
मुंबई: ‘नथुराम गोडसेने केवळ महात्मा गांधी यांना पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीना यांच्यावर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतिदिन ७५ वर्षांनंतर साजरा करण्याची वेळ आली नसती,’ असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार?, असा प्रश्नही त्यांनी भाजपला केला आहे. (Sanjay Raut on India Pakistan Partition)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडंच फाळणीचा दिवस ‘फाळणी वेदना दिन’ म्हणून दरवर्षी स्मरण करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या घोषणेच्या अनुषंगानं संजय राऊत यांनी ‘सामना’त लेख लिहिला आहे. त्यातून त्यांनी फाळणीच्या आठवणी जागवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. राऊत यांनी लेखात सध्याच्या अफगाणिस्तानचा संदर्भ दिला आहे. ‘एका देशाचं अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज अफगाणिस्तानात दिसतेय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असं वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती?,’ असा सवाल राऊत यांनी केला आहे.
वाचा: अफगाणिस्तानात नेमकं काय घडलं?; वाचा मटा संवादमध्ये
‘भारताची फाळणी हा एक भयपट होता. जनतेच्या हृदयातील घावच होता. तो घाव आजही भरलेला नाही. पण स्वातंत्र्यानंतर फाळणीस फक्त गांधी-नेहरू-काँग्रेसलाच जबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली. कारण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, लोहियांसारखे मोजके नेते सोडले तर फक्त काँग्रेस आणि त्यांचे नेतेच होते. मुसलमानांना अधिक काही देणार नाही हे तेव्हा गांधींचं धोरण होतं, असं राऊत यांनी म्हटलं आहे. देश स्वतंत्र होताच पं. नेहरूंनी मुसलमानांचा राखीव मतदारसंघ रद्द करून टाकला. मुसलमानांसाठी दिलेल्या सोयी-सवलती रद्द करून टाकल्या, ही गोष्ट राजकीय हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घ्यायला हवी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यानंतर फाळणीस फक्त गांधी-नेहरू-काँग्रेसलाच जबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली. कारण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, लोहियांसारखे मोजके नेते सोडले तर फक्त काँग्रेस आणि त्यांचे नेतेच होते.
संजय राऊत
आज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? वेदना कशी शांत होणार?, असा सवाल राऊत यांनी केला आहे. ‘फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम ठसठसत आहे. भारत पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असं प्रत्येकाला वाटत असलं तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचंच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावं,’ असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.