हायलाइट्स:
- सांगलीत सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घोडागाडी शर्यतीचे आयोजन
- पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांनी ठोकली धूम
- शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखल
सांगली : आटपाडी तालुक्यात पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीनंतर सांगलीवाडी ते आष्टा रोडवर रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या स्पर्धेत पाच घोडागाडी मालक सहभागी झाले होते. घोडागाडी शर्यतीची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांनी धूम ठोकली. पोलिसांनी दोन छकडा गाडी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तसंच सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपआमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांना आव्हान देत आटपाडी तालुक्यात बैलगाडा शर्यत पार पाडली. सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासह ४१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र यानंतरही जिल्ह्यात शर्यतीचे प्रकार सुरूच आहेत. आटपाडीचे प्रकरण ताजे असतानाच सांगलीवाडी ते आष्टा रोडवर रविवारी पहाटे घोडागाडी शर्यत पार पडली.
सांगलीवाडी ते आष्टा मार्गावरील बंद पडलेल्या टोल नाक्यापुढे अज्ञातांनी घोडागाडीच्या शर्यतीचे आयोजन केलं होतं. या शर्यतीमध्ये सांगलीसह परिसरातील पाचहून अधिक घोडागाडी मालक सहभागी झाले होते.
सांगलीवाडीमध्ये बेकायदेशीर घोडागाडी शर्यतींचे आयोजन केल्याची माहिती सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. या पथकातील झाकीर काझी, विक्रम खोत, अरुण जाधव यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून शर्यतीत सहभागी झालेले स्पर्धक आणि आयोजकही पळून गेले. पोलिसांनी शर्यत स्थळावरून दोन छकडा गाडी आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, बेकायदेशीर स्पर्धेचे आयोजन करणारे संयोजक आणि सहभागी स्पर्धकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.