हायलाइट्स:
- मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीची झुंज अपयशी
- उपचारादरम्यान झाला मृत्यू
- मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने उचललं होतं टोकाचं पाऊल
मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर २० ऑगस्ट रोजी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष सोपान जाधव (वय ५४) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जाधव यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत जाधव यांचा शेतजमिनीवरुन वाद सुरू होता. याच वादातून चार वेळा हाणामारी, शिवीगाळ, भांडणे झाली असून याबाबत मंचर पोलिसांत शिंदे यांच्यावर तीन तर जाधव यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आपल्यावर अन्याय होत असल्याचं वाटत असल्याने सुभाष जाधव हे २० ऑगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचले. मंत्रालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी प्रवेशद्वारावरच विष प्राशन केलं. पोलिसांनी त्यांना जीटी रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
दरम्यान, न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या व्यक्तीचा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आता मृत्यू झाल्याने शासनाच्या भूमिकेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसंच सुभाष जाधव यांना मंत्रालयात प्रवेश का नाकारण्यात आला, याबाबत पुढील काळात चौकशी होते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.