मुख्यमंत्र्यांना धक्का! मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम अखेर सुरू

हायलाइट्स:

  • मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम सुरू
  • किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
  • पुढचा नंबर अनिल परब यांचा; सोमय्यांचा दावा

दापोली:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अखेर जमीनदोस्त झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडं तक्रारी करून कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर नार्वेकर यांनी स्वत:च अनधिकृत बांधकामाचं पाडकाम सुरू केल्याचं कळतं. नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक व अत्यंत विश्वासू शिलेदार असल्यानं या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Demolition of Milind Narvekar Bungalow started)

वाचा: नारायण राणेंना एकनाथ शिंदेंचं खणखणीत प्रत्युत्तर, म्हणाले…

किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्या तोडकामाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘करून दाखविले, पुढचा नंबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा’, असंही सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘उद्या मी स्वत: दापोलीला जाऊन तोडकामाची पाहणी करणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड ३ मध्ये येत होते. या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतलेली नव्हती, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. तशी तक्रारच त्यांनी संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडं केली होती. मात्र, कोणतीही कारवाई झाली नव्हती. ‘मुख्यमंत्री कार्यालयाचा जबरदस्त दबाव असल्यामुळं रत्नागिरी जिल्हा प्रशासन या अनैतिक काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची पाठराखण करत आहे,’ असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. लोकायुक्त व राष्ट्रीय हरित लवादाकडं देखील या प्रकरणी सुनावणी सुरू होती.

वाचा: ‘फाळणीसाठी फक्त गांधी, नेहरू, काँग्रेसला जबाबदार धरले जाते कारण…’

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यावर देखील कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

Source link

Demolition of Milind Narvekar BungalowKirit SomaiyaMilind Narvekar BungalowMilind Narvekar Bungalow Demolitionकिरीट सोमय्यादापोलीमिलिंद नार्वेकररत्नागिरी
Comments (0)
Add Comment