अॅटली दिग्दर्शित जवान रिलीज झाल्यानंतर, ‘ड्रीम गर्ल २’, ‘ओएमजी २’ आणि ‘गदर २’ च्या बॉक्स ऑफिस कमाईवर लक्षणीय परिणाम झाला आहे. शाहरुख खान-नयनतारा यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ७५ कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे.
‘गदर २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ ने बुधवारी २.९० कोटींचा व्यवसाय केला. गुरुवारी त्याला मोठा धक्का बसला आणि त्याची कमाई थेट निम्म्याहून कमी झाली. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘गदर २’ ने ७ सप्टेंबर २०२३ रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर १.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह गदर २ ने या २८ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ५१०.५९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
‘गदर २’ ची गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये ३९.१५ टक्के ओक्युपन्सी होती. ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर धडकणार हे निश्चित असले तरी त्याचा फटका त्याला सहन करावा लागणार आहे, मात्र असे असतानाही ‘गदर २’ने दीड कोटींचा व्यवसाय करून निर्मात्यांना दिलासा दिला आहे.
‘गदर २’च्या स्क्रिन कमी झाल्या
‘गदर २’चे बजेट ७०-७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. ‘जवान’ रिलीज झाल्यानंतर ‘गदर २’च्या स्क्रिनही कमी झाल्या आहेत. पहिल्या आठवड्यात ३५००-३७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात २१००० पेक्षा कमी स्क्रीनवर आला आहे. मात्र, २ तास ५० मिनिटांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे.
‘गदर २’ ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडू शकेल का?
सनी देओलच्या ‘गदर २’ ने अनेक विक्रम मोडले असले तरी यावर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ला तो मागे टाकू शकला नाही. पठाणचा विक्रम किंवा एकूण कलेक्शन मोडता आले नाही. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी भारतात ५७ कोटींचा व्यवसाय केला तर ‘गदर २’ने ४० कोटींचे खाते उघडले. जर सनी देओलला शाहरुख खानचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५४३ कोटी रुपयांचा आकडा पार करावा लागेल, जगभरात हा आकडा १०५५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे आकडे पाहिल्यानंतर गदर २ हा विक्रम मोडणे कठीण आहे असे वाटते.