दहावी आणि बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची कटऑफ डेट म्हणजेच अंतिम तारीख जाहीर केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना याबाबत सजग केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी केवळ १४ सप्टेंबर पर्यंतच प्रवेश घेऊ शकतात. राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे.
(वाचा: MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)
दहावी आणि बारावी मूळ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू होती. ते सुरू असतानाच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण प्राप्त झाले होते, जे अनुत्तीर्ण झाले होते किंवा ज्यांचे पुनर्मूल्यांकण करायचे होते अशा विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचा देखील निकाल जाहीर झाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे आता सर्वांना १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत केली आहे. त्यामुळे आता प्रवेशासाठी अवघे पाच दिवस विद्यार्थ्यांच्या हातात उरले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत म्हणजेच कॅप व्यक्तिरिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती सुरू राहील. संस्थास्तरावरील कोट्यात किंवा केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. त्यासाठी ई-छाननी पद्धत किंवा प्रत्यक्ष छाननी पद्धत याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे.
संबंधित उमेदवारांनी संस्थांमध्येही स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. या उमेदवारांची गुणवत्तायादी संस्थास्तरावर तयार केली जाईल. संस्थांनी १४ सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थांना १५ सप्टेंबरला ऑनलाइन भरावी लागणार आहे. मात्र या तारखा अस्थायी स्वरुपाच्या आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे त्यात बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक https://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी प्रवेशासाठीची सविस्तर सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
(वाचा: MIDC Recruitment 2023: मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्यांसाठी आजच करा अर्ज..)