सध्या कोणत्या विभागानुसार किती शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन पालिका प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसातच महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा शुभारंभ होणार आहे. येत्या काही दिवसातच या भरतीची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तरुणांसाठी ही रोजगाराची मोठी संधी असणार आहे. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
नाशिक महानगर पालिकेत अनेक पदे रिक्त आहेत, कारण मागील चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होत असून प्रशासनाला देखील याचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेची हद्द देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे पालिकेच्या जबाबदार्याही वाढत आहेत. अशातच पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. परिणामी आपुर्या मनुष्यबळावर पालिकेचा कारभार सुरू आहे. यावरच तोडगा म्हणून आता पालिकेने भरतीसाठी कंबर कसली आहे.
(वाचा: MITC Recruitment 2023: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..)
या भरती प्रक्रियेची सर्व जबाबदारी टीसीएस कंपनीला देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून सर्वप्रथम आरोग्य, अग्निशमन या विभागातील ७०६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर उर्वरीत पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. यापूर्वी महानगरपालिकेने भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे १४ हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवरील आर्थिक ताण वाढेल आणि उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली गेली.
त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंतिम आकृतीबंध तयार करुन तो आयुक्तांना सादर करुन शासनाच्या नगररचना विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. सध्या त्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. त्यामुळे लवकरच नाशिक महानगर पालिकडून २ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
(वाचा: CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख..)