मुंबई शहरामध्ये क्लायमेट मिटीगेशन, रेझिलियन्स आणि अॅडाप्टेशनच्या प्रक्रिया आणि संरचना निर्माण करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर पालिकेद्वारे दोन वर्षापूर्वी मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला होता. हा प्लान तयार करण्यामागे वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (WRI) ही संस्था अग्रभागी होती.
(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र-युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषदेचे आयोजन)
या प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (WRI ) संस्थेने मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलाचे पायलट साईट म्हणून निवड केली होती. याअंतर्गत विद्यानगरी संकुलामधील विविध समस्या सोडविण्यासाठी नेचर बेस्ड सोल्युशन्स कसे राबविता येतील ह्या दृष्टीने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तरुणांच्या स्टार्टअप्सने ११ प्रकारची सादरीकरणे केली होती. या ११ नाविन्यपूर्ण संकल्पनापैकी ॲबसोल्युट वॉटर प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने मांडलेल्या प्रकल्पाची निवड करण्यात आली होती. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (WRI) संस्थेच्या पुढाकाराने आणि अर्थसाहाय्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा विद्यानगरी संकुलात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. ह्या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यापीठाचे अभियांत्रिकी, सामान्य प्रशासन, भूगोल आणि नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी ह्या विभागांनी अथक परिश्रम केले.
या सांडपाणी प्रकल्पांतर्गत दिवसाला १० ते १२००० लिटर सांडपाणी पुनर्प्रक्रिया होऊन विद्यापीठाच्या वणराईसाठी वापरले जात आहे. या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून नजीकच्या काळात अशाच पद्धतीचे प्रकल्प इतरही संकुलात तयार केले जाणार असून या प्रकल्पांचे नियोजन विद्यापीठातील विविध विभाग, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात यावर्षीपासून उत्कृष्ट संशोधक, संशोधन निधी आणि उत्कृष्ट विभाग पुरस्कार)