(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव : भाजपा मंञी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आज जळगाव शहरातील वसंत स्मृती भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी कोंबड्या सोडल्या.
संपूर्ण राज्यातील शिवसैनिक आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येत असून जळगावात देखील याची प्रक्रीया सुरू आहे. शिवसेना जळगाव महानगरच्यावतीने शहरातील टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. येथे शिवसैनिकांनी डुक्कर आणत त्यास नारायण राणे यांच्यासह त्यांच्या मुलांच्या प्रतिमा बांधून निषेध करण्यात आला.
यानंतर लागलीच शिवसैनिकांनी आपला मोर्चा भाजप कार्यालयाकडे नेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ,महापौर जयश्री महाजन,सुनिल महाजन,गजानन मालपुरे,शिवराज पाटील,शोभा चौधरी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसैनिकांनी बळीराम पेठेतील भाजप कार्यालयात जावून नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कोंबड्या सोडल्या. यावेळी पोलिसांचा ताफा देखील होता. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसैनिकांना अडविण्याचा प्रयत्न केला.यावेळी काही वेळ गोंधळ उडाल्याने पोलिसांची देखील चांगलीच दमछाक उडाली.