नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा केल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना रस्त्यावर उतरली असून नारायण राणे व भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी महत्त्व देत नाही’ इतकंच पवार म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंना काही कळत नाही. त्यांना भारताचा स्वातंत्र्यदिन कितवा हे माहीत नाही. सचिवाला विचारतात. मी तिथं असतो तर कानाखाली वाजवली असती,’ असं वक्तव्य राणेंनी महाड इथं बोलताना केलं होतं. हे बोलताना त्यांनी एकेरी भाषेचा वापर केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसैनिकांच्या तक्रारीची दखल घेत थेट राणेंच्या अटकेचे आदेश काढले आहेत. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रत्नागिरीला रवाना झालं आहे. यावरून सध्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे.

वाचा: ‘मी नॉर्मल माणूस नाही’ म्हणणाऱ्या राणेंना पोलीस आयुक्तांचं सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांबद्दल राणेंनी केलेलं वक्तव्य हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नव्हे महाराष्ट्राचा अपमान आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तर, जयंत पाटील यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘नारायण राणे यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला व देशाला कळली,’ असा टोलाही जयंत पाटील यांनी हाणला आहे. ‘राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही, तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा: नारायण राणे नारळासारखे; चंद्रकांत पाटील यांनी केली पाठराखण

Source link

Narayan Rane Vs Shiv SenaSharad Pawar Latest Commentsharad pawar news todaySharad Pawar on Narayan Raneनारायण राणेशरद पवार
Comments (0)
Add Comment