जळगावात तुफान राडा; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कोंबड्या फेकल्या!

जळगाव: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज जळगावात देखील पडसाद उमटले. शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात दोन कोंबड्या फिरकावत हल्ला केला. यावेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. दुपारी दीड वाजता हा गोंधळ झाला. यावेळी भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत दोन्ही गटांना दूर केले.

वाचा: शिवसैनिक भाजपच्या कार्यालयात घुसले; भाजपच्या कार्यकर्त्यांवर कोंबड्या फेकल्या!

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेच्या महापौर जयश्री सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत जळगाातील बळीरामपेठेत असलेल्या भाजप कार्यालयावर चालून आले. या ठिकाणी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी देखील घोषणबाजी करण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दोन कोंबड्या भाजप कार्यालयाच्या दिशेने भिरकावल्या. याच कोंबड्या भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने फेकल्या. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून भाजप कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून घेतले. पण त्यानंतर काही शिवसैनिक थेट प्रवेशद्वार ओलांडून कार्यालयात घुसले. त्यांनी कार्यालयाचे मुख्य दरवाजावर चालून जात तो उघडण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केल्याने वाद विकोपाला जाऊन एकमेकांना धक्काबुक्की झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी भाजप कार्यालयाच्या बाहेर हुसकावून लावले. तरीही शिवसेनेचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर जाऊन घोषणाबाजी करतच होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली.

वाचा: नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया

‘नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भाजप कार्यालयात आलो होतो. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागावी, अशी आमची मागणी असल्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.

त्यांनी कोंबड्या आणल्या, वाघ आणायला हवे होते- दीपक सूर्यवंशी

भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले की, शिवसेनेने जो प्रकार केला, तो अत्यंत निषेधार्ह आहे. ही शिवसेनेची संस्कृती नव्हे. शिवसैनिक स्वतःला वाघ समजतात तर त्यांनी कोंबड्या आणायला नको होत्या. तर वाघ आणायला हवे होते. त्यांनी महिलांना पुढे केले. त्यामुळे त्यांनी बांगड्या भराव्यात. या आंदोलनाला पोलिसांचे संरक्षण असल्याचाही आरोप त्यांनी केला. शिवसैनिक भाजप कार्यालयात घुसेपर्यंत पोलिसांनी मज्जाव का केला नाही? असा आमचा सवाल आहे. भाजप कार्यालयात घातलेल्या गोंधळाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे दीपक सूर्यवंशी म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाचे महामंत्री यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. या प्रकारासंदर्भात आम्ही पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

जळगाव शहर पोलिसात दोन तक्रारी

राणेंच्या वक्तव्याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन आणि माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दोन स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.

चौकात डुकरे आणून प्रतिकात्मक आंदोलन

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर शहरातील टॉवर चौकात दोन डुकरे आणून प्रतिकात्मक आंदोलन केले. नारायण राणे व त्यांची दोन्ही मुले हे सातत्याने मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. डुकरांप्रमाणे त्यांना कुठेही तोंड घालण्याची सवय आहे. म्हणून डुकरे आणून आम्ही राणेंच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले, अशी प्रतिक्रिया माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दिली.

Source link

JalgaonNarayan Ranenarayan rane news todayNarayan Rane Vs Shiv SenaShiv Sena Vs BJP In Jalgaonनारायण राणे
Comments (0)
Add Comment