मुंबई विद्यापीठात संस्कृत दिन २०२३ साजरा; कलिना कॅम्पसमध्ये पार पडला सोहळा

University of Mumbai Sanskrit Day 2023: “उत्साह हे सर्व प्रयत्नांचे बीज आहे आणि अतिशय उत्साहाने विज्ञान आणि प्राचीन ज्ञानप्रणालींचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे” असे प्रतिपादन डॉ. मल्हार कुलकर्णी, प्राध्यापक, मानव्य आणि सामाजिक विज्ञान विभाग, आयआयटी मुंबई यांनी शनिवार, ३० सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या संस्कृत दिन सोहळ्याला उपस्थित श्रोतृवर्गाला संबोधित करताना केले.

संस्कृत भाषा अध्ययनाची लोकप्रियता वाढल्याने प्राचीन विज्ञान आणि धर्मग्रंथांच्या अभ्यासामध्ये वृध्दि होत आहे, असेही ते म्हणाले. डॉ. कुलकर्णी आयआयटी मुंबईमध्ये पाणिनीय (संस्कृत) व्याकरणावर आधारित संशोधन करत आहे त्यामुळे त्यांची निरीक्षणे महत्त्वाची आहेत. संस्कृत भाषेतील त्यांचे प्रावीण्य संस्कृतमध्ये क्रिकेट समालोचन करण्याच्या त्यांच्या आवडीवरूनही दिसून येते. त्यांनी पुढे नमूद केले की, संस्कृत विभागाने तयार केलेले विद्यार्थी अनुकूल अभ्यासक्रम अनेक विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृतवर भर दिल्याने इतर अनेक आयआयटी शाखांमध्ये संस्कृत विषय सुरू करण्यात आला आहे.

(वाचा : University Of Mumbai : मुंबई विद्यापीठाने तयार केला गांधीजींच्या लिखाणाचा कॉर्पस)

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये संस्कृत विभागाच्या वतीने शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे, डॉ. माधवी नरसाळे, डॉ. सुचित्रा ताजणे, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक उपस्थित होते. विभागाच्या प्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० चे अवलंब करणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीता हा नवीनच सुरू झालेला पदविका अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने चालू आहे. विभागाने या वर्षी हीरक महोत्सवी बोधचिन्हाचे उद्घाटन केले असून विभागाची ६० गौरवशाली वर्षे पूर्ण करण्यानिमित्त विभागाने भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावर ६० व्याख्यानांची मालिका सुरू केली असल्याचे डॉ. शकुंतला गावडे यांनी सांगितले. संस्कृत विभाग व ऋतायन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

जागतिक संस्कृत दिनानिमित्त डॉ. गौरी माहुलीकर यांच्या उद्घाटनपर व्याख्यानाने मालिकेची सुरुवात झाली. ‘बृहदारण्यक उपनिषद’ या विषयावर विभागाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी डॉ. विजय पंड्या यांचे व्याख्यान झाले. विभागातील माजी विद्यार्थ्यांनी प्रख्यात संस्कृत कवी डॉ. हर्षदेव माधव यांची मुलाखत घेतली. संस्कृताध्ययनाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने विभागाने विविध संकल्पनांवर बुकमार्क्स लाँच केले आहेत. त्यानंतर विभागातील विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विभागातील विद्यार्थ्यांनी त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.

(वाचा : Mumbai University Exams: तयारीला लागा… ; मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ४३९ परीक्षेच्या तारखा जाहीर)

Source link

iit mumbaimu kalina campusmu sanskrit daymumbai universitysanskrit daysanskrit day 2023sanskrit dinuniversity of mumbai sanskrit day 2023
Comments (0)
Add Comment