बिग बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानं, आता येत्या काळाचा निर्मात्यांना फायदा करून घ्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर नव्या चित्रपटांच्या घोषणांसह तयार चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होऊ लागल्या आहेत. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘पानिपत’नंतर कोणता चित्रपट जाहीर करणार, याची उत्सुकता होता. गोवारीकर यांनी नुकतीच आदि शंकराचार्य यांच्यावरील ‘शंकर’ या कलाकृतीची घोषणा केली आहे. ‘आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यासा’च्या सोबतीनं तयार होत असलेल्या या चित्रपटातील कलाकारांबद्दल उत्सुकता आहे. ‘लो बजेट कॉमेडी’ या जातकुळीच्या ‘दर्रन छू’ या करण पटेल आणि आशुतोष राणा अभिनित चित्रपटाचीही त्याच्या पोस्टरमुळं चर्चा आहे.
‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’ही प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. सुशांत पांडा दिग्दर्शित ‘प्रचंड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला. पितोबॅश, मनोज मिश्रा, प्रकृती मिश्रा, जयजित दास, अनंत महादेवन, अतुल श्रीवास्तव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. ‘सत्ता विरुद्ध श्रद्धा’ या थीमवरचा ‘मंडळी’ हा चित्रपटही चर्चेत आहे. अभिषेक दुहान, आँचल मुंजाल, रजनीश दुग्गल, विनीतकुमार, ब्रिजेंद्र काला हे कलाकार यात दिसतील.
‘यारियाँ’ या मैत्रीवर बेतलेल्या चित्रपटानं २०१४मध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून शंभर कोटी क्लबमध्ये जागा मिळवली. हिमांश कोहली, रकुल प्रीत सिंग, इवलीन शर्मा, निकोल फारिया यांच्या त्यात भूमिका होत्या. आता नऊ वर्षांनी ‘यारियाँ २’ हा या थीमवरचा पुढचा चित्रपट येत आहे. मैत्री आणि कुटुंब असा विषय असलेल्या या चित्रपटात दिव्या खोसला-कुमार, य़श दासगुप्ता, मिझान जाफरी, पर्ल पुरी, भूषणकुमार अशा युवा कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. राधिका राव आणि विनय सप्रू त्याचं दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर यश मिळतं का, याकडं लक्ष असेल. दीपंकर चक्रवर्तीचं दिग्दर्शन असणाऱ्या ‘नॉट गिल्टी’ या चित्रपटात हितेन तेजवानी, ब्रिजेंद्र काला आणि संदीप यादव हे कलाकार दिसणार आहेत. नव्वदच्या दशकातल्या ‘मसाला एंटरटेनर’ या थीमवरील ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट जाहीर झाला आहे. ‘ड्रीमगर्ल’फेम दिग्दर्शक राज शांडिल्य या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. मोठी स्टारकास्ट न घेता, छोट्या शहरांतल्या कथा आणि अभिनयासाठी ओळखले जाणारे कलाकार, ही वैशिष्ट्यं असणारे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कामगिरी करतात, याचं उत्तर लवकरच मिळेल.
हिंदी चित्रपटांनी सलग मिळवलेलं यश बॉक्स ऑफिसच्या कमाईला चालना आणि मनोरंजनसृष्टीला तजेला देणारं आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीचे ‘अच्छे दिन’ पुन्हा सुरू झालेत, असं म्हणायला निश्चित वाव आहे. आगामी काळातल्या चित्रपटांच्या कमाईच्या आलेखावर याचा परिणाम निश्चितच होईल.
– तरण आदर्श, सिनेमा व्यावसाय विश्लेषक