राज्यस्तरीय शैक्षणिक बैठकीनंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात ज्युनिअर कॉलेज आणि कोचिंग क्लासेस यांच्यात ‘टाय-अप’ असल्यामुळे, विद्यार्थी हे ज्युनिअर कॉलेजांमध्ये अनुपस्थित राहतात. केवळ सीईटीच्या गुणांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळत असल्याने, विद्यार्थी क्लासेसमध्ये सीईटी परीक्षांचा अभ्यास करतात. या पार्श्वभूमीवर वर्गांमध्ये ‘फेस रिकग्निशन’द्वारे हजेरी लावण्यासाठी यंत्रणा लावण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. या प्रस्तावात बारावी तसेच, सीईटीच्या गुणांबाबात ‘वेटेज’ही देण्यात येण्याची शक्यता आहे.
याशिवाय, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी तपासण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. त्यासाठी वर्गात कॅमेरे बसविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे घेऊन, त्यांचा निकाल तातडीने जाहीर होण्यासाठी, तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबवर प्रश्न आणि त्यांचे पर्याय किंवा वर्गातील मोठ्या स्क्रिनवर प्रश्न विचारून रीमोटद्वारे त्याची उत्तरे देण्याची सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
(वाचा : Success Story IPS Meera Borwankar: ‘लेडी सिंघम’ मीरा बोरवणकर यांच्या शिक्षणाने तुम्हीही जाल भारावून, असा आहे प्रवास)
क्लासेसनी ज्युनिअर कॉलेज सुरू करावेत :
शहरातील एखाद्या ज्युनिअर कॉलेजसोबत टाय-अप करून, कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे अकरावी-बारावीच्या वर्गामध्ये विद्यार्थी उपस्थित नसतात. अशावेळी क्लासेसनी स्वत:चे ज्युनिअर कॉलेज काढून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करावे. या क्लासेसनी कॉलेज सुरू करण्याची परवानगी मागितल्यास, त्यांना परवानगी देण्यात येईल, असेही केसकर यांनी स्पष्ट केले.
यंदापासून पाचवी आणि आठवीत नापास म्हणजे ‘नापास’च :
राज्य सरकारने पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात पुन्हा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची कार्यवाही यंदापासून करण्यात येणार आहे. त्यानुसार परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुर्नपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर, त्यांना त्याच वर्गात ठेवण्यात येईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
(वाचा : NEET SS 2023 Result: नीट एसएस २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर; या लिंकवरून डाउनलोड करा रिझल्ट)