हायलाइट्स:
- नारायण राणेंना जामीन मिळताच शिवसेनेनं साधला निशाणा
- भास्कर जाधव यांनी राणेंना पुन्हा डिवचलं
- शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटकेत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane News) यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतरही शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम आहे. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत राणेंवर निशाणा साधला आहे.
‘नारायणराव राणे हे अॅबनॉरमल आहेत. त्यामुळे कोर्टाने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं होतं,’ असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राणेंवर टीका करताना भास्कर जाधव पुढे म्हणाले की, ‘मी कुणावरही कशीही टीका केली तरी माझं काही बिघडू शकत नाही, असा नारायण राणेंचा समज होता. मात्र आज नियतीने त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद नसून शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या देण्यासाठीची यात्रा होती. आजच्या घटनेनंतर तरी नारायण राणे यांनी बोलताना भान ठेवावं,’ असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना यापुढे काय भूमिका घेणार?
नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना विरोध करणार का, असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, ‘मुळात शिवसेनेनं नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कुठेही विरोध केला नव्हता. त्यामुळे आता यापुढे हा वाद वाढवायचा की संपवायचा याचा निर्णय भाजपने घ्यावा,’ असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.