कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे सदस्य अनिल वागडे, माजी भारतीय रेल्वे अधिकारी अनिल रामटेके, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सल्लागार आणि भाषातज्ञ अनुराधा बेले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या इन्फेड विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी धवड, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (NEERI) डॉ. अरविंद शाक्य आदी. मान्यवर उपस्थित होते. सध्या विविध क्षेत्रात उच्च पदावर असणारे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पीएनआरआय सेंटर आणि एकलव्यचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएनआरआय टीमचे सहकार्य आणि मार्गदर्शन या संपूर्ण प्रक्रियेत मोलाचे ठरले.
महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने देशातील नामांकित विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी सहा महिन्यांच्या या निवासी कोर्ससाठी १० पेक्षा जास्त राज्यातून जवळपास ६० हुन अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षेसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचा या सेंटरचा हेतू आहे. यासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान, नेतृत्वक्षमता आणि कौशल्य विकास करण्यावरही या सेंटरचा भर असणार आहे.
एकलव्य मागील सहा वर्षांपासून देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि शिबिर आयोजित करत आले आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या एकलव्यचे तब्बल १२०० हुन अधिक पहिल्या पिढीतील विद्यार्थी देशभरात शिक्षण घेत आहेत.
उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण करणारे ‘एकलव्य’ :
उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे या हेतूने सुरू झालेल्या एकलव्यच्या चळवळीतून अनेक पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना बळ मिळत आहे. सत्यशोधक युवा संसाधन केंद्र देशभरातील विविध शिक्षण संस्थांमध्ये वंचित विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार करणार आहे. यासाठी तुम्हीही मदतीचा एक हात पुढे करू शकता.
– राजू केंद्रे ( संस्थापक, एकलव्य )