‘रील अँड रिअल’ या विषयावर ७ मिनिटाच्या निर्धारीत वेळेत अर्जून याने उत्स्फूर्तपणे भाषण करून परिक्षकांची मने जिंकली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी अर्जून शिवरामकृष्णन याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेचे गुण वृद्धींगत करणे आणि विचार पटवून देण्याचे कौशल्य विकसीत करण्यासाठी राजभवनाच्या माध्यमातून माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी ९ ऑक्टोबर २०२३ ला या स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई विद्यापीठात पार पडली होती. यामध्ये विविध २५ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या प्राथमिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास अंतिम फेरीसाठी म्हणजेच राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होता येते. मराठी आणि इंग्रजी माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेली ही स्पर्धा नियमाप्रमाणे इंग्रजी माध्यमासाठी मुंबई विद्यापीठ आणि मराठी माध्यमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धा मुंबई विद्यापीठात पार पडल्या असून राज्यातील एकूण ११ विद्यापीठे या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचे विद्यापीठ विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
(वाचा : आता Li-Ion Battery Recycle करून वापरात आणणे सहज शक्य; मुंबई विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा जगाला होणार फायदा)