जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं फक्त दोन शब्दांचं ट्वीट!

हायलाइट्स:

  • जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया
  • नारायण राणेंनी जामिनावर बाहेर येताच २ शब्दांत व्यक्त केल्या भावना
  • आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील कोर्टाने जामीन मंजूर केला आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वत्र जल्लोष केला. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र राणे यांनी सध्या तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.

एकीकडे नारायण राणे यांनी हे ट्वीट केलेलं असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र पुन्हा एकदा शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी याच्या एका सिनेमातील दृष्य शेअर करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप करतील, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण कसं वळण घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

Narayan RaneShivsenaनारायण राणेभाजपशिवसेना
Comments (0)
Add Comment