हायलाइट्स:
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला.
- कोर्टाने राणे यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
- राणे यांना हा जामीन सशर्थ मंजूर करण्यात आला असून अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी लेखी हमी नारायण राणे यांच्याकडून कोर्टाने घेतली आहे.
महाड: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने रात्री उशिरा जामीन मंजूर केला. कोर्टाने राणे यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. राणे यांना हा जामीन सशर्थ मंजूर करण्यात आला असून अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी लेखी हमी नारायण राणे यांच्याकडून कोर्टाने घेतली आहे. तसेच राणे यांना येत्या सोमवारी ३० ऑगस्टला आणि पुढील महिन्यात सोमवार दिनांक १३ सप्टेंबर या दिवशी रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. (Mahad court grants conditional bail to Union Minister Narayan Rane)
नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना महाड कोर्टाने आणखीही काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, राणे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना हवा असल्यास तो राणे यांना द्यावा लागणार आहे. मात्र पोलिसांना राणे यांना ७ दिवस अगोदर तशी नोटीस द्यावी लागणार आहे. राणेंनी साक्षीदारांवर दबाव टाकता कामा नये असेही कोर्टाने बजावले आहे. त्याच प्रमाणे राणे यांनी पुराव्यांशी छेडछाड करू नये अशी सूचनाही कोर्टाने राणे यांना दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मला PMO मधून फोन आला: विनायक राऊत
जामीन मंजूर झाल्यानंतर राणे कोर्टातून निघाले ते थेट मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. मुंबईला जात असताना नारायण राणे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी, मुलगे माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे देखील होते.
दरम्यान, पोलिसांनी राणे यांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली नसल्याने राणे यांना सरकारी वकिलाने मागितलेली पोलिस कोठडी नाकारल्याचे कोर्टाने सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्याच्या ‘त्या’ झापडीचे काय?; राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या माजी मंत्र्याचा सवाल
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सुरू होणार जन आशीर्वाद यात्रा
दरम्यान, राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नारायण राणे यांची दिवसभर दगदग झाली असून ताणतणावाचा सामना केला आहे. यामुळे त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे ते मुंबईत दाखल होत विश्रांती घेतील. तसेच काही वैद्यकीय तपासण्या देखील करतील. त्यांच्या विश्रांतीनंतर त्यांची जन आशीर्वाद यात्रा पूर्ववत सुरू होईल, असे दरेकर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेचीच आहे राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा’
नारायण राणे यांनी काल मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांना महाडला नेण्यात आले. तेथे त्यांना महाड कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.