केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नाराणय राणेंवर जोरदार टीका केली आहे.
‘नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेनं केला आहे. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही. पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक डराव डराव करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात.’ अशी जहरी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे ही अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत. पंतप्रधान स्वतःला अत्यंत नॉर्मल माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणून घेतात. हा त्यांचा विनम्र भाव आहे. पण राणे म्हणतात, मी नॉर्मल नाही. त्यामुळं कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळं केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवून राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत- बोलत आहेत. सध्या जो कायाकल्प सुरू आहे या नवनिर्मितीत राणे यांच्यासारख्यांना मानपान मिळत आहेत. म्हणूनच ‘नॉर्मल’ नसलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मारहाण’ करण्याची बेलगाम भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे १०५ हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे. राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करू लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळय़ात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा केल्याने महाराष्ट्राच्या संयमाचा बांध तुटला आहे. या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून २० वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत,’ असा टोला लेखामधून लगावण्यात आलाय.
‘भारतीय जनता पक्षाला या बेताल बादशाहीची मोठी किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.