पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात मुंबई विद्यापीठही अग्रेसर

Mumbai University News: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमाना मंजुरी मिळाली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्याशाखा, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ३/४ वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. यापूर्वी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित राज्यातील सर्वाधिक ६२ स्वायत्त महाविद्यालयात ४ वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम राबविण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला असून राष्ट्रीय धोरणानुसार प्रागतिक दृष्टिकोन ठेऊन सर्व ८१२ बिगर स्वायत महाविद्यालयासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे.

(वाचा : Mumbai University च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा पहिला नंबर)

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रा. रवींद्र कुलकर्णी समितीच्या अहवालातील शिफारशी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय याचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या ८७४ एवढ्या संलग्नित महाविद्यालयांची संख्या बघता साधारणतः ‘अ’ श्रेणी असलेल्या लीड महाविद्यालयांच्या अंतर्गत ८ ते १० महाविद्यालयांचा समुह म्हणून या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची योजना तयार करण्यात आली आहे. यानुसार ३/४ वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अंतर्गत सहा व्हर्टिकलची सुरळीत अंमलबजावणी होईल.

समुह महाविद्यालयांतर्गत विविध वर्टिकल अंतर्गत बहुउद्देश्यीय आणि नाविन्यपूर्ण संयोजन शिकवण्यासाठी त्यांची संसाधने सामायिक केली जाणार ज्यामध्ये मायनर कोर्सेस, ओपन इलेक्टिव्स, व्हॅल्यू एज्युकेशन आणि को-करिक्युलर कोर्सेसचा समावेश असेल. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेली लवचिकता यामुळे प्रदान केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण टप्प्यांतर्गत पारंपरिक पदवीचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून उर्वरित व्यावसायिक पदवीचे अभ्यासक्रमही लवकरच तयार केले जाणार आहेत.

(वाचा : Dr. P. C. Alexander वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा पहिला नंबर; विवेक वारभुवनची मराठी वक्तृत्व स्पर्धेत बाजी)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत विविध परदेशी विद्यापीठांबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

मुंबई विद्यापीठाने हे एक महत्वपूर्ण पाऊल :

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने हे एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. पदवीच्या या ३/४ वर्षीय अभ्यासक्रमांची आणि श्रेयांक आराखड्याची रचना करताना सर्वंकष विचार करण्यात आला असून विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत, कौशल्याधिष्ठीत, बहुउद्देश्यिय, बहुआयामी आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता येतील.”
– प्रा. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)

Source link

mumbai universitymumbai university newsNational Education PolicyNEPमुंबई विद्यापीठराष्ट्रीय शैक्षणिक धोरणराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
Comments (0)
Add Comment