हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईवरून चर्चा सुरूच
- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी आजही घेतली पत्रकार परिषद
- देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर दिली प्रतिक्रिया
नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना २ सप्टेंबर रोजी नाशिकला हजर राहावे लागणार आहे. ‘माझे ज्ञान अल्प असून विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्र्यांचे ज्ञान अफाट आहे. त्यामुळे कायद्याचा आधार घेऊन नाशकात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. (Deepak Pandey Reply To Devendra Fadnavis)
वाचा:‘राणेंना अमानवीय वागणूक दिली गेली, अटक केल्यानंतर त्यांना…’
पोलीस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमचे पथक मंत्रीमहोदयांना अटक करण्यासाठी गेले होते. हे पथक संगमेश्वर येथे पोहचले तेव्हा राणे यांना रायगड पोलीस घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली. रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयात नाशिक पोलिसांनी आपली भूमिका मांडली आहे. २ सप्टेंबर रोजी राणे यांनी नाशिकमध्ये हजर राहावे अशी विनंती केली आहे. त्यानुसार त्यांना यावे लागणार आहे. नाशिक पोलिसांनी बजावलेल्या नोटीसवर मंत्र्यांनी सही देखील केली आहे. त्यांनी सहकार्य केले नाही तर पुढील कारवाई होऊ शकते.’
वाचा: नारायण राणेंच्या बाबतीत पोलिसांचे आता ‘वेट अँड वॉच’, कारण…
नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश काढले होते. त्यावर भाजपनं संताप व्यक्त केला होता. नाशिकचे पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?; असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता पांडेय यांनी अत्यंत संयमानं उत्तर दिलं. ‘विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे. माझं ज्ञान अल्प आहे. त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. ‘मी माझ्या आदेशावर ठाम आहे. कोणाला त्यावर आक्षेप असेल तर संविधानातील तरतुदींनुसार न्यायालयात जाऊन आदेश रद्द करवून घेऊ शकतात,’ असंही पांडेय यांनी स्पष्ट केलं.
वाचा: राणेंना आव्हान देणाऱ्या युवा शिलेदारांना उद्धव ठाकरेंकडून शाबासकी!