शिवकालीन देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर क्षेत्रात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
(वाचा : Mumbai University News: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात मुंबई विद्यापीठही अग्रेसर)
मुंबई विद्यापीठ आयोजित या महोत्सवामध्ये लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, लंगडी, रस्सीखेच, मल्लखांब, पंजा लढवणे, कुस्ती, दंड बैठका, दोरीच्या उड्या, मॅरेथॉन, शरीरसौष्ठव, फुगड्या, ढोल ताशा पथक प्रदर्शन, विटी-दांडू, दांड- पट्टा, लाठी- काठी, ढाल- तलवार, गदा/मुदगल या खेळांचा समावेश असणार आहे. या क्रीडा महोत्सवात कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचा अधिकाधीक सहभाग वाढविण्यासाठी तसेच, या खेळ प्रकारांची मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
युवकांमध्ये पारंपारिक खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यातून त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचा अधिकाधीक सहभाग वाढविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेकाची ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात जून २०२४ पर्यंत विविध मान्यवरांची व्याख्याने आणि उपक्रम राबवले जाणार आहेत.
(वाचा : Mumbai University चा कार्बन न्युट्रल ग्रीन कँपससाठी पुढाकार; पहिल्या टप्प्यात विद्यानगरी संकुलासाठी योजना तयार)