गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमे दिवाळीत बॉलिवूडपेक्षा वरचढ ठरत असल्याचं दिसून आलंय. यंदाचं वर्षदेखील अपवाद नसेल असा अंदाज वर्तवला जातोय. स्टारडमच्या पारड्यात वरचढ असलेल्या सलमान खानचा सिनेमा प्रदर्शित होत असताना इतर हिंदी सिनेमे त्याच्या आजूबाजूला फिरकत नाहीत; पण दोन मराठी सिनेमे ‘टायगर’च्या शिकारीसाठी दबा धरून बसले आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांचे हे सिनेमे आहेत. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ आणि सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ असे आशयघन मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसंच दिवाळीच्या पुढील आठवड्यात अर्थात ‘टायगर ३’च्या प्रदर्शनानंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
स्क्रीनसाठी चुरस
महाराष्ट्रात सिनेमागृहांच्या स्क्रीन्सची संख्या मागणीच्या तुलनेनं कमीच आहे. त्यामुळे सिनेमा-सिनेमांमध्ये स्क्रीन विभागणीवरून नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. सध्या ‘टायगर ३’च्या निर्मात्यांनी १२ नोव्हेंबरपासून मुंबईतील बहुतांश स्क्रीन स्वतःकडे राखीव ठेवल्या आहेत. या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंगदेखील सुरू झालंय. दुसरीकडे मराठी सिनेमांनी शुक्रवार आणि शनिवारच्या स्क्रीन स्वतःकडे ठेवल्या आहेत. रविवारपासून प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढल्यास नव्यानं अधिक स्क्रीन्स मराठीला मिळतील; असा विश्वास मराठी सिनेमांच्या वितरक मंडळींना आहे.
…तर स्क्रीन कमी होत नाहीत
आपल्याकडे छंद म्हणून मराठी सिनेमा बनवला जातो. आजही मराठी सिनेनिर्मितीला इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त झालेला नाही. गुंतवणूक आणि त्यातून मिळणार परतावा; हे गणित मराठी सिनेमाने अचूकपणे सोडवायला हवं. मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही अशी ओरड होते; पण सिनेमागृह व्यावसायिकांनादेखील त्यांचा व्यवसायच करायचा आहे. सिनेमा पाहायला मोठ्या संख्येने प्रेक्षक आल्यावर सिनेमागृह व्यावसायिकदेखील हमखास स्क्रीन्स वाढवणारच. चांगला सिनेमा असेल आणि प्रेक्षक तो सिनेमागृहात येऊन पाहत असेल तर स्क्रीन्स कमी होत नाहीत.
– सुजय डहाके, दिग्दर्शक
प्रेक्षकांना आवडेल; विश्वास आहे
‘नाळ’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तोदेखील दिवाळीत प्रदर्शित झाला होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळीतच ‘नाळ भाग २’ प्रदर्शित होतोय. या सिनेमाची गोष्ट जितकी संवेदनशील आहे तितकाच चित्रपट नयनरम्य आहे. सुधाकर रेड्डीने महाराष्ट्राचं सौंदर्य कुशलतेनं पडद्यावर चित्रित केलं आहे. आमच्या सिनेमासोबत हिंदी सिनेमा प्रदर्शित होत असला तरी ‘नाळ’चा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात प्रेक्षक सिनेमा पाहतील आणि त्यांना तो आवडेल; असा विश्वास आहे.
– नागराज मंजुळे, अभिनेते