हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलन
- जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई
- शिवसेनेच्या महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
जळगाव : करोना निर्बंधामुळे सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. असं असतानाही महापौर जयश्री महाजन यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी महापौर महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच टॉवर चौकात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या महानगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटल्यानंतर मंगळवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गजानन मालपुरे, प्रितम शिंदे, शोभा चौधरी, सरीता कोल्हे व त्यांच्यासोबत असलेल्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात तीन डुकरे आणून राणेंच्या विरुद्ध घोषणा दिल्या. यानंतर महापालिकेसमोरही घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी बळीरामपेठेतील भाजप कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करुन भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. तिथं हजर असलेल्या पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी कमलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महापौर जयश्री महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा
केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटल्यानंतर मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत राणेंच्या समर्थनात घोषणा दिल्या. तसंच ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या प्रकरणी भाजपचे महानगराध्यक्ष सुर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष दिप्ती चिरमाडे, आनंद सपकाळे, दीपमाला काळे, नगरसेविका रंजना वानखेडे, जयेश भावसार, प्रकाश पंडीत, विजय वानखेडे यांच्यासह १५ ते २० जणांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.