अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा ‘दीप’ मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. तर, उंच जागी आकाशदिवा किंवा आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.
महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या दिवसांत मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. पण, हल्ली ही परंपरा दिवसागणिक मागे पडत चालली आहे. ‘यक्षरात्री’, ‘दीपमाला’, ‘दीपप्रतिपदुत्सव’, ‘दिपालिका’, ‘सुखरात्री’, ‘सुख सुप्तिका’ अशी सर्वांच्या लाडक्या दिवाळीची इतर नावांनी ओळख. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असते.
वसुबारस : भारतदेश कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. याला ‘गोवत्सद्वादशी’ असंही म्हणतात. पारंपरिकतेने या दिवशी संध्याकाळी ‘गाय आणि वासराची’ पूजा करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे-वासरे आहेत त्यांच्याघरी गोड पुरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील स्त्रिया गाईचे पाय धुवून, तिला फुलांची माळ घालून त्यांची पुजा करतात. निरांजनाने ओवाळून मग केळीच्या पानावर गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि सगळे अन्नपदार्थ दिले जातात.
धनत्रयोदशी : अश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या सणामागे अनेक आणि धर्मनिहाय दंतकथा मानल्या जातात.त्यातील एक म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून लक्ष्मी देवी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये ‘गुडोदकम्’ म्हणतात. जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात.
नरक चतुर्दशी : नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले होते. त्यामुळे कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्थीस ‘नरक चतुर्थी’ साजरी केली जाते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. या दिवशीअभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे आणि सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
लक्ष्मीपूजन : अश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस ‘बलिप्रतिपदा’ हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून ही ओळखतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.
गोवर्धन पूजा : मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’असे नाव मिळाले असे मानले जाते. भाऊ-बहिणीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी’ देऊन करतो.