पण हल्ली शाळा आणि क्लासेस यामध्ये विद्यार्थी इतके व्यापून जातात की त्यांना स्व-अभ्यासासाठी वेळ नसतो किंवा त्यांना ते कंटाळा करतात. पण अभ्यास जर खर्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा असेल तर त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः करणे गरजेचे आहे. त्यासाठीच शाळेत गृहपाठ दिले जायचे. म्हणूनच आजही विद्यार्थ्यांच्या स्व-अभ्यासवर शाळा भर देताना दिसतात. पण बर्याचदा पालकांची तक्रार असते की मुले घरी अभ्यास करत नाहीत. म्हणूनच त्यासाठी काही खास टिप्स आज पाहणार आहोत.
शाळा आणि क्लासेस याचे नियोजन: विद्यार्थी दिवसाचे ५ तास शाळेत असतात. त्यामुळे प्रवास आणि शाळेतला अभ्यास यांचा त्यांच्या मनावर, शरीरावर ताण आलेला असतो. त्यात शाळेतून आल्यावर पालक विद्यार्थ्यांना क्लासेस मध्ये पाठवतात. यामध्ये मुलांची बरीच ओढाताण होते आणि त्यांना घरी अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणून या वेळेचे नियोजन करायला हवे. कारण शाळेप्रमाणेच क्लासेस मध्ये शिक्षण दिले जात असल्याने त्यांचा स्वअभ्यास होत नाही. तो होण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करून द्यायला हवे. क्लासेस इतकेच स्व- अभ्यासाला महत्व द्यायला हवे.
खेळाच्या वेळाही महत्वाच्या: विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करायचा असेल तर त्यांचे मन आनंदी असायला हवे. त्यासाठी त्यांच्यावर केवळ अभ्यासाचा ताण न देता त्यांच्या खेळाच्या वेळाही जपायला हव्या. त्यांचे मन प्रफुल्लित राहिले तर विद्यार्थी स्वतः अभ्यासमध्ये रुची घेतील.
पोषक वातावरण हवे: विद्यार्थ्यांना घरात पोषक वातावरण मिळायला हवे. त्यांना काय आवडते, काय नाही याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकांत हवा असतो तर काही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पालक समोर लागतात. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पूर्ण शांतता लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन तसे वातावरण घरात निर्माण करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांना घरात अभ्यास करताना आनंद मिळेल.
(वाचा: ZP Satara Bharti 2023: योग प्रशिक्षकांसाठी सातारा जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)
झोप महत्वाची: घरी अभ्यास करणे म्हणजे रात्र रात्र जागून अभ्यास पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होत नाही. दिवस भरातल्या वेळेतच घरच्या अभ्यासाचे नियोजन व्हायला हवे. अनेक विद्यार्थी रात्रीच्या वेळेत अभ्यास करत बसतात. पण अशाने अभ्यास होण्याऐवजी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्वाची आहे.
घरामध्ये एक जागा निश्चित करा: घर लहान असो की मोठे विद्यार्थ्यांची अभ्यासाची जागा निश्चित हवी. कारण एका विशिष्ट ठिकाणी अभ्यास केल्यास त्या जागेची आपल्याला सवय होत. तिथे मन एकाग्र होते. हळूहळू त्या जागेवर बसल्यावर आपल्याला अभ्यासाची इच्छा उत्पन्न होते. शक्यतो ती जागा एखादे टेबल, अभ्यासाची फळी किंवा बैठी जागा असावी. झोपून अभ्यास करणे टाळावे.
अभ्यासाचे व्यवस्थापन आणि वेळापत्रक: आपले विषय किती, त्यात कोणत्या विषयाच्या अभ्यास जास्त आहे यानुसार अभ्यासाचे नियोजन असायला हवे. त्या दिवसाचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करायला हवा. अभ्यास अपूर्ण राहून साठत राहिला की त्याचाही ताण जाणवतो. त्यामुळे घरी अभ्यास कसा करतानाही त्याचे नीट नियोजन व्हायला हवे. शाळेमध्ये जसे वेळापत्रक असते तसे तुमचे घरच्या अभ्यासाचे देखील हवे. कोणत्या वेळेत कोणता विषय, कोणत्या विषयाला किती प्राधान्य दिले पाहिजे यानुसार एक वेळापत्रक तयार हवे. अभ्यासाचा आराखडा तयार असेल तर आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करण्यात वेळ जात नाही. परिणामी घरी देखील शिस्तबद्ध अभ्यास होतो.
सराव महत्वाचा: घरच्या अभ्यासात सरावाला महत्व दिले पाहिजे. शाळेत जे शिकवले आहे त्याची उजळजी केल्याने शिकलेल्या गोष्टी अधिक पक्क्या होतात. यामध्ये शाळेत सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी, धडयाखालील स्वाध्याय याचा सराव केला तरी विद्यार्थ्यांना फायदा होईल.
(वाचा: Career In DMLT: विज्ञान शाखेची आवड असेल तर ‘डीएमएलटी’ कोर्स आवर्जून करा; पगार आणि संधीही आहेत भरपूर)