हायलाइट्स:
- महिलेने मुलीसह नदीत उडी टाकून केली आत्महत्या
- निराशेतून उचललं टोकाचं पाऊल
- दोघींचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश
कोल्हापूर : पतीचे दोन वर्षांपूर्वी झालेलं निधन आणि दत्तक घेतलेली मुलगी मतिमंद निघाल्याने निराश झालेल्या महिलेने मुलीसह वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या (Kolhapur Suicide News) केली. दोन दिवसांपूर्वी सावत्र बापाने मुलीला नदीत फेकल्याची घटना ताजी असतानाच आईनेच मुलीसह आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेश्मा अमोल पारगावकर या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी सहा वर्षांपूर्वी एका चार महिन्याच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी ती मुलगी मतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन वर्षांपूर्वी रेश्मा हिच्या पतीचे अपघाती निधन झालं. एकीकडे मतिमंद मुलगी आणि दुसरीकडे पतीचं निधन यामुळे ती गेले काही दिवस निराश होती. या निराशेतूनच मंगळवारी रात्री तिने मुलीसह वारणा नदीत उडी मारली.
धक्कादायक बाब म्हणजे आधी ही महिला आत्महत्या करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिची समजूत काढून घरी पाठवले होते. पण, पुन्हा मध्यरात्री येऊन तिने मुलीसह नदीत उडी मारली. सकाळी पोलीस व आपत्कालीन यंत्रणेने या दोघींचा शोध घेतला असता ऐतवडे खुर्द येथे त्या दोघींचेही मृतदेह आढळून आले.
दरम्यान, घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव तलाठी अनिल पोवार आणि इतरांनी भेट दिली.