‘संविधान दिना’चे भाषण :
आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रीणिंनो. तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले.
२६ नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत.
संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत.राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालवता येत नाही, म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली.पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. तर, डॉ. भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते.
संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.
२०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून, संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी, अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत.
या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल. आज देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशांपेक्षा वाईट आहे.त्याला अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.त्यांना शोषणाचे बळी व्हावे लागते. मित्रांनो, आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे.आर्थिक विषमतेची खोल दरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
या देशातील या सर्वात महान दिनाबद्दल माझे विचार ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार.
जय हिंद, जय भारत…!