मुंबई विद्यापीठात आज संविधानाचा जागर; ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीः मूळ आणि त्याचे निराकरण’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Consitution Day Celebration at Mumbai University : २६ नोव्हेंबर ‘राष्ट्रीय संविधान दिन’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात आज (२६ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रॉब्लेम ऑफ रुपीः मूळ आणि त्याचे निराकरण” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मा. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस, राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दिपक केसरकर, प्रवरा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरु प्राचार्य डॉ. विष्णू मगरे, भारतीय रिजर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक डॉ. सतीश मराठे यांची सन्माननीय उपस्थिती लाभली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे (भा.प्र.से.), बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे (आयआरएएस), मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका आणि परिषदेच्या निमंत्रिका प्रा. मनिषा करणे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक आणि परिषदेचे निमंत्रक प्रा. बळीराम गायकवाड यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडणार आहे. ‘भारतीय संविधान आणि रुपयाच्या समस्येची समकालीन प्रासंगिकता’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय योगदान’ या विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. २६ नोव्हेंबर राष्ट्रीय संविधान दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले असून, ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन सत्रानंतर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स इकॉनॉमिक थॉट्स अँड कंटेम्पररी रिलेव्हंस’ या विषयावर डॉ. रूथ कट्टूमुरी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन या मांडणी करणार आहेत. ‘डॉ. आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन इन इन्ट्रोड्युशिंग कॉन्स्टीट्यूशनल प्रोव्हिजन फॉर अपलिफ्टमेंट ऑफ द स्टेटस ऑफ इंडियन वुमेन’ या विषयावर डॉ. श्रुत्री तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गदर्शन करणार आहेत. प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार श्री. जयराम पवार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अँड इंडियन कॉन्स्टीट्यूशन’ यावर प्रकाश टाकणार आहेत. पहिल्या सत्रानंतर डॉ. गणेश चंदनशिवे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

दुसऱ्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स थॉट्स ऑन इंडियन एग्रीकल्चर अँड इट्स कंटेम्पररी रिलेव्हंस’ या विषयावर डॉ. किसन इंगोले, निवृत्त प्राध्यापक, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई हे प्रकाश टाकणार आहेत. ‘डॉ. आंबेडकर अँड द स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टीट्यूशन’ या विषयावर डॉ. भीमराव भोसले, केंद्रीय विद्यापीठ हैद्राबाद हे मांडणी करणार आहेत. समारोपीय सत्रासाठी पद्मश्री डॉ. रमेश पतंगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या परिषेदेच्या आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Source link

Constitution Day CelebrationConstitution Day Celebration at Mumbai Universitymumbai universitymumbai vidyapeethसंविधान दिनसंविधान दिवस
Comments (0)
Add Comment