राणेंना ताब्यात घेताय की नाही?; अनिल परब यांचा तो व्हिडिओ व्हायरल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे मंगळवारी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. अटकेची कारवाई होत असताना भाजपचे नेते व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. त्याचवेळी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मोबाइल संभाषणाचा एक व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला. बुधवारी दिवसभर याच व्हिडीओची सोशल मीडियासह सर्वत्र चर्चा रंगली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘…कानाखाली चढवली असती’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे नारायण राणे यांना अटक होण्यापूर्वी भाजप नेत्यांनी या कारवाईस बराच विरोध केला. अटक वॉरंट दाखवा, नंतरच कारवाई करा, अटक वॉरंट असेल तर आम्ही स्वत: गाडीत येऊन बसतो, यावर भाजप नेते हटून बसले होते. पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश वरून कोणीतरी देत असल्याचा दावाही भाजप नेते करीत होते. याचदरम्यान अनिल परब यांच्या रत्नागिरीतील पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्रकार परिषद सुरू असताना परब यांना पोलिसांचे फोन येत होते, त्या दरम्यानचे संभाषण रेकॉर्ड झाले. ते असे…

मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारून घेतो सीएम साहेबांना.

हो…. फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना?

हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो.

हो… ठीक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.

हे संभाषण सुरू असताना मध्येच आमदार भास्कर जाधव हे मोबाइलमधील काही मेसेज परब यांना दाखवतात.

भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय…त्यानंतर काही वेळाने परब फोन करतात.

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं?

नाय, पण ते करावं लागेल तुम्हाला…तुम्ही घेताय की नाही ताब्यामध्ये?

हं, ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?

अहो, हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.

पण मग घ्या ना. पोलिस फोर्स वापरून करा… अहो वेळ लागणार. मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची. ठिकाय…ओके.

फोनवरील संभाषण संपल्यानंतर जाधव हे परब यांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं…

मग परब हे जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलिस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली आता पोलिस ओढून बाहेर काढतायेत…

जाधव म्हणतात… चला आता, (पत्रकार परिषद) संपवायला हवं.

त्यावेळी काही पत्रकार परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का? त्यावर परब म्हणतात, मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आत्ता सांगू शकत नाही. मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू?

Source link

anil parab latest newsanil parab video viralnarayan rane vs shivsenaअनिल परब न्यूजअनिल परब व्हिडिओ व्हायरल
Comments (0)
Add Comment