निवडणूक साक्षरता ही आज काळाची गरज बनली आहे. निवडणूक साक्षरता म्हणजे मतदार नोंदणी, मतदान प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसह निवडणूक प्रक्रियेबद्दल व्यक्तींना असलेली समज आणि ज्ञान. भारताच्या इतर भागांप्रमाणेच मुंबईतही नागरिकांमध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना त्यांच्या निवडणूक अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले शिक्षक व विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरात प्रत्यक्ष जाऊन पथनाट्य, प्रदर्शन, भित्तीचित्र, प्रबोधन गीते, वक्तृत्व, पोवाडा, सर्वेक्षण, वक्तृत्व, परिसंवाद आणि परिषदा अशा विविध उपक्रमांद्वारे जनतेमध्ये निवडणूक साक्षरता वाढीस लागण्यास हातभार लावणार आहेत.
हे प्रशिक्षित प्रतिनिधी मतदार शिक्षण कार्यक्रम राबवून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास प्रेरित करणार आहेत. व्यापक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ, प्रिंट आणि सोशल मीडियासह विविध माध्यमांच्या माध्यमातून जागृती मोहिमा चालवणार आहेत व निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावणार आहेत. त्यानंतर महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार असून तशा पद्धतीने या कार्यक्रमांचे नियोजन मुंबई विद्यापीठ करत असल्याचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. कुणाल जाधव यांनी सांगितले. सदर उपक्रम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तार कार्यात सहभाग घेतलेल्या ३५१ पदवी महाविद्यालयांच्या विस्तार कार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह नियमितपणे आयोजित केला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठातील विविध महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे शैक्षणिक विस्तार उपक्रम केले जातात व समाजोपयोगी अध्ययन ऊपक्रम शैक्षणिक विस्तार कार्य प्रकल्पांच्या माध्यमातून राबवण्यात येतात. विविध शैक्षणिक आणि तांत्रिक संसाधनांसह आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याच्या विशिष्ट उद्देशाने समुदाय आधारित शैक्षणिक विस्तार कार्य उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास, उद्योग अभिमुखता, करिअर मार्गदर्शन, माहिती तंत्रज्ञान, उद्योजकता विकास, समाजातील महिलांची स्थिती, पर्यावरण संरक्षण, आणि लोकसंख्या शिक्षण अशा विविध शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. पथनाट्य, प्रदर्शन, भित्तीचित्र, प्रबोधन गीते, वक्तृत्व, पोवाडा, सर्वेक्षण, वक्तृत्व, परिसंवाद आणि परिषदा अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत. समाजातील विविध समस्या जसे की, प्रदूषण, एड्स, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण, वृक्षारोपण, निरक्षरता, बालकामगार, हुंडाबळी, कुपोषण या विषयी सामाजिक जागृतीसाठी हे उपक्रम करण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून विभागाने या वर्षी निवडणूक साक्षरता जागृती मोहीम हा उपक्रम हाती घेतला असल्याचेही आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. कुणाल जाधव यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर युनिटचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वंभर जाधव यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.