नुकतेच विद्यापीठाने स्वतंत्रपणे विस्तार कार्य उपक्रमांचे ऑनलाइन दस्तऐवज सादरीकरण पोर्टल (ओडीएसपी) विकसित केले आहे ज्याद्वारे विस्तार कार्यात सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे दस्तऐवज सुलभतेने ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर महाविद्यालयांचे विस्तार कार्य उपक्रमांचे सर्व अहवाल ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. आज मुंबई विद्यापीठात या पोर्टलचे लोकार्पण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाशी संलग्नित विस्तार कार्य उपक्रमात सहभाग घेतलेल्या सुमारे ३६,००० विद्यार्थ्यांना या पोर्टलचा लाभ होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विस्तार कार्य उपक्रमांचा लाभ घेऊन या पोर्टलच्या माध्यमातून विस्तार कार्य अहवाल व संबंधित कागदपत्रे दाखल करावीत असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. या पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
(वाचा : Mumbai University News: मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल; यूजीसीकडून ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा प्रदान)
समाजातील विविध समस्या जसे की, प्रदूषण, एड्स, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण, वृक्षारोपण, निरक्षरता, बालकामगार, हुंडाबळी, कुपोषण या विषयी सामाजिक जागृतीसाठी हे उपक्रम करण्यात येतात. सध्या विभागाचे वार्षिक विस्तार कार्य उपक्रम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५१ पदवी महाविद्यालयांच्या ७५० विस्तार कार्य शिक्षक आणि सुमारे ३६,११२ विस्तार कार्य विद्यार्थ्यांसह नियमितपणे आयोजित केले जात आहेत. विभागाच्या वेळापत्रकानुसार, पदव्युत्तर विभाग, संलग्न महाविद्यालये आणि त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामार्फत हाती घेतलेल्या विस्तार कार्य उपक्रमांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, कायदा, अभियांत्रिकी, शिक्षण आणि व्यवस्थापन या विविध विद्याशाखांमधील पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नेमून दिलेले १२० तासांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पूर्ण केल्यावर आणि त्यांनी सादर केलेल्या विस्तार कार्य प्रकल्पांचे मूल्यमापन करून अंतिम परीक्षेत दहा अतिरिक्त गुण दिले जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरु होताच महाविद्यालयातून नोंदणी करावी लागते. महाविद्यालयीन विद्यार्थी विस्तार कार्य प्रकल्पांसाठी दरवर्षी नव्याने नोंदणी करतात. सामाजिक बांधिलकी या उद्देशाने विद्यार्थी समाजात जाऊन समाजाला सामावून घेतात आणि समाजाला भेडसावणार्या सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी आपल्या भूमिकेची जाणीव करून देतात. एक आदर्श नागरिक म्हणून मानवी कर्तव्ये लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि तंत्रज्ञान व संशोधन कौशल्ये वाढविण्यासाठी विभागामार्फत या विस्तार कार्य प्रकल्पात दाखल केले जाते.
या संपूर्ण प्रकीयेमध्ये विविध कागदपत्रांचा समावेश होतो. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही सर्व कागदपत्रे प्रत्यक्षरित्या सादर करण्याकरिता मुंबईला यावे लागते. कागदपत्रे सादर करण्याच्या पारंपारिक ऑफलाइन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि साहित्याची छपाई केली जाते. यामुळे अतिरिक्त मनुष्यबळासह कागदपत्रांवर मोठा खर्च होतो. त्यामुळे ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्यासाठी असे पोर्टल विकसित करणे आवश्यक होते ज्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी व मूल्यमापन प्रक्रिया करणे सोपे झाले असून खर्चात मोठी बचत झाली असल्याचे विभागाचे संचालक प्रा. कुणाल जाधव यांनी सांगितले.
ऑनलाइन डॉक्युमेंट सबमिशन पोर्टल (ओडीएसपी) चे बरेच फायदे आहेत. आता यापुढे पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणांहून विस्तार कार्य उपक्रमात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची व महाविद्यालयाची कागदपत्रे प्रत्यक्ष येऊन जमा करण्याची गरज नाही. ती कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येतील. ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या कागदपत्रांची डिजिटल छाननी व तपासणी विभागाकडून करण्यात येईल. विविध महाविद्यालयांनी सादर केलेल्या कार्याचा अहवाल व ध्वनी चित्रफित तसेच छायाचित्रे देखील ऑनलाइन सादर करता येणार आहेत. तसेच १० अतिरिक्त गुणांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सादर केलेल्या प्रकल्प अहवालांच्या मूल्यमापनाची ऑनलाइन सुविधा देखील देण्यात आली आहे. यापुढे ३६ हजार विद्यार्थी व सुमारे ७५० शिक्षकांना ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप सुलभतेने करता येणार आहे. विस्तार कार्य उपक्रमांसाठी लागणाऱ्या अधिक कालावधीची अधिकृत नोंद उपलब्ध होणार आहे आणि विभागाच्या परिपत्रकांचे एका क्लिकवर प्रसार करणे आणि संबंधित कार्याचा डेटा सुरक्षित ठेवणे सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी संचालक, परीक्षा व मूल्यमापन यांना त्यांच्या गरजेनुसार माहिती सादर करणे आता सुलभ झाले आहे.
आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुंबई विद्यापीठाशी संलग्न ३५१ महाविद्यालयांतील ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी विस्तारकार्यात सक्रीय आहेत. दुर्गम जिल्ह्य़ातील सहभागी महाविद्यालये विभागाला भेट देऊन विस्तार कार्यांतर्गत महाविद्यालय व समाजात राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे नोंदणी अर्ज, उपक्रम अहवाल, छायाचित्रे व वार्षिक अहवाल कार्यालयीन नोंदीसाठी सादर करतात. विस्तारकार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १० अतिरिक्त गुणांच्या लाभासाठी प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो.
दुर्गम जिल्ह्यातून विद्यार्थी हे प्रकल्प अहवाल विभागाला सादर करीत आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत महाविद्यालयाच्या आणि विभागाच्या वार्षिक विस्तार कार्य उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ऑनलाइन दस्तऐवज सबमिशन पोर्टल (ओडीएसपी) विकसित केले आहे. विद्यापीठाने ही संपूर्ण प्रक्रिया विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि वेळ व श्रम वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. या पोर्टलमुळे विस्तार कार्यात सहभाग घेतलेल्या सर्व महाविद्यालयांकडून विद्यापीठाचे अभिनंदन व आभार व्यक्त होत आहेत.
(वाचा : मुंबई विद्यापीठात संशोधन स्पर्धेतील प्रतिभावंतांचा सन्मान; नव प्रतिभावंतांच्या संशोधनवृत्तीस चालना देण्यासाठी विद्यापीठ करणार सहाय्य)