हायलाइट्स:
- महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं निधन
- किडनी निकामी झाल्याने सुरू होते उपचार
- कुस्ती क्षेत्रावर पसरली शोककळा
सूर्यकांत आसबे | सोलापूर :
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि १९९२ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळविणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आप्पालाल शेख यांचं निधन झालं आहे. किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आप्पालाल शेख यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी आहेत. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठले. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांनाही कुस्तीची आवड निर्माण झाली. १९८० साली आप्पालाल यांचे बंधू इस्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
भावाचा वारसा पुढे नेत पुढे १९९२ साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या-मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली होती. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र १९९१ साली न्यूझीलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्णपदक देखील पटकावलं आहे. आप्पालाल यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी देखील २००२ सालची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत.
आप्पालाल जेव्हा लंगोट बांधून लाल मातीत उतरत तेव्हा समोरच्या पैलवानांची भंबेरी उडत असे. शड्डू ठोकून कुस्तीला सुरुवात झाली की समोरच्याची पाठ जमिनीला लावल्याशिवाय हा गडी कधीच मागे हटला नाही. मात्र त्याच जिगरबाज पैलवानाला आजारामुळे स्वतःची पाठसुद्धा जमिनीवर टेकता येत नव्हती. कोल्हापुरात असताना व्यायाम करताना एका गाडीने आप्पालाला यांना धडक दिली होती. ज्यात त्यांना गंभीर इजा झाली होती. तेव्हापासून काही ना काही आजार त्यांच्या पाठीमागे सुरू होते. का
ही महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं स्पष्ट झालं. उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. महाराष्ट्र शासनाकडून महिन्याला ६ हजार रुपये इतकेच मानधन त्यांना मिळत असे. परंतु अपुरे मानधन आणि शेतीवर निर्भर असलेल्या आप्पालाल यांना उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. ज्यांनी कुस्तीसाठी सर्व काही पणाला लावलं आज त्यांची तीनही मुलं कुस्तीच्या फडात आपलं नशीब आजमावत आहेत. वडिलांचं ऑलिम्पिक पदक मिळवण्यां अपुरे रहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे.