नर्सरी ते दुसरीच्या शाळांच्या वेळा बदलण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक (नर्सरी, ज्युनिअर, सीनिअर केजी) शिक्षण अधिकृतपणे शिक्षणाच्या प्रवाहात आले आहे. त्यामुळे नर्सरी ते दुसरीपर्यंत (तीन ते आठ वयोगट) सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलण्यात येतील. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली असून, काही दिवसांत शाळांच्या वेळांबाबत निर्णय जाहीर होईल. त्यानुसार राज्यातील सकाळी भरणाऱ्या शाळांची वेळ थोड्या उशिराने एकसारखी राहणार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या वक्तव्यानंतर लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी; तसेच त्यांचे आरोग्य हे उत्तम राहण्यासाठी, सकाळी शाळा नको, असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गुरुवारी व्यक्त केले. याला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, पालकांकडूनही त्यांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. या विषयाबाबत मंत्री केसरकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. ‘शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लहान मुलांची झोप पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मेंदूचा विकास हा झोपेशी निगडित आहे. अशावेळी सकाळी सातला शाळा असल्यामुळे, त्यांची झोप पूर्ण होत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही लहान मुलांच्या शाळा बदलण्याबाबत चाचपणी केली होती. याबाबत आता एक पाऊल पुढे टाकले असून, शिक्षण विभागाचे अधिकारी, डॉक्टर आणि तज्ज्ञांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत पुढील काही दिवसांत सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळा थोड्या उशिराने ठरवण्यात येतील. एकदा वेळ ठरली ती संपूर्ण राज्यासाठी एकच असेल. त्या वेळेचा स्पष्ट उल्लेख शासन निर्णयातही करण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळांना वेळ पाळावी लागेल’, असे केसरकर यांनी म्हटले आहे.

शाळांची वेळांत थोडा बदल शक्य :
बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुले रात्री उशिरापर्यंत जागतात. त्यासाठी मुलांना पहाटेच उठावे लागते. पूर्ण झोप न झाल्याने, त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. अशावेळी सकाळी सातच्या आसपास भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणे शक्य आहे. ही वेळ बदलण्यासाठी दोन्ही सत्रांच्या शाळांच्या वेळापत्रकात थोडा बदल करावे लागेल. सकाळी नऊची वेळ योग्य ठरू शकते, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source link

changing School timingsdeepak kesarkar newsEducation Departmentmaharashtra governor ramesh baisMumbai news todayPune newsramesh bais on school timeschool timingssleep timing of studentरमेश बैस
Comments (0)
Add Comment