पाचवी ते आठवी… परीक्षांत नापासही करणार; पाचवीला ५० गुणांची, तर आठवीला ६० गुणांची वार्षिक परीक्षा

Education News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आठवीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या धोरणात बदल केला आहे. यंदापासून पाचवीच्या विद्यार्थ्यांची ५० गुणांची, तर आठवीच्या विद्यार्थ्यांची ६० गुणांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. राज्य सरकारने या परीक्षांची आणि त्यांच्या मूल्यमापनाची कार्यपद्धती जाहीर केली आहे.

राज्यात २०१०-११ पासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आली. त्यानुसार मूल्यमापनामध्ये ‘ड’ श्रेणी मिळालेल्या अथवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता त्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र त्यातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. तसेच विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने त्यांना मागील वर्गातील अध्ययन कौशल्य अपेक्षित प्रमाणात मिळाली नसली तरी त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा लागत होता. त्यातून मुलांच्या पुढील अध्ययनात अडथळा येत असे. या पार्श्वभूमीवर आता इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पुनर्परीक्षेची संधी

पाचवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची तोंडी आणि ४० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. तर आठवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची तोंडी आणि ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळवावे लागतील. मात्र विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना शाळेतील शिक्षकांकडून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची जून महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. या पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी

नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी किमान अपेक्षित अध्ययन कौशल्य प्राप्त केले की नाही, याची खात्री करता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावण्यासह पुढील शैक्षणिक आव्हाने आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याचा उद्देश असल्याचे सरकारकडून नव्या निर्णयाचे समर्थन करताना सांगण्यात आले आहे.

समित्या स्थापन करणार

राज्य सरकारने या परीक्षांचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या परीक्षा शाळास्तरावर घेतल्या जाणार आहेत. मात्र परीक्षांवेळी केंद्रस्तरीय भरारी पथके तयार करून शाळांना भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानुसार या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडत असल्याची काळजी घेतली जाणार आहे.

वयानुरूप प्रवेशासाठीही बंधन

पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार थेट प्रवेश दिला जाणार आहे. मात्र सहावी ते आठवी इयत्तेच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांना पाचवीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.

Source link

Deepak Kesarkareducation newsEducation News in MarathiEducation News UpdatesNational Education Policyschool educationदीपक केसरकरशालेय शिक्षण विभाग
Comments (0)
Add Comment