हायलाइट्स:
- ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणी
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं
- आरोपींविरोधात गुन्हा दाखल
सांगली : तासगाव येथे लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने पकडला होता. हा ट्रक सोडण्यासाठी उपवनसंरक्षक यांच्यासह एका ऑपरेटरला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं. कौशल्या हणमंत भोसले (वय ३२, वनक्षेत्रपाल) आणि डेटा ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे (वय ४३, रा. मणेराजुरी) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक तासगावच्या वनविभागाने महिनाभरापूर्वी पकडला होता. हा ट्रक सोडावा यासाठी उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या विभागाने तक्रारीची दखल घेऊन तासगाव येथे सापळा रचला. त्यानुसार गुरुवारी तक्रारदाराला उपवनसंरक्षक कौशल्या भोसले यांच्याकडे पाठवण्यात आलं.
यावेळी भोसले यांनी गाडी सोडायची असेल तर ३० हजार रुपये लागतील, असं सांगितलं. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला ३० हजार रुपये घेऊन भोसले यांच्याकडे पाठवण्यात आले. यावेळी भोसले यांनी ही रक्कम वनविभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे याच्याकडे देण्यास सांगितलं. त्यानुसार तक्रारदार रक्कम घेऊन शिंदे याच्याकडे गेला. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदे याला रंगेहाथ पकडलं. तर कौशल्या भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, धनंजय खाडे, संजय संकपाळ, सलिम मकानदार, अजित पाटील, राधिका माने, बिना जाधव, श्रीपती देशपांडे, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.