नुकत्याच या व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अल्युमनी असोसिएशनच्या अध्यक्षा प्रा. रितू दिवाण आणि विभागाच्या संचालिका प्रा. मनिषा करणे यांच्या हस्ते करण्यात आले. अँड्रॉईड आणि विंडोज् ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत असलेल्या या आभासी वर्गखोलीच्या माध्यमातून इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, रायटिंग बोर्डसह पर्सनल कम्प्युटर म्हणून याचा वापर करता येणार आहे. विभागात असलेल्या सेमिनार रुमचे अद्ययावतीकरण करून या आभासी वर्गखोलीची निर्मिती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षणाची गरज असताना अशावेळी विभागामार्फत हा अत्यंत स्तूत्य उपक्रम राबविल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विभागातील माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. हायब्रिड पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या या सुविधेमुळे ज्ञानार्जनाच्या कक्षा रुंदावणार असून भौगोलिक सीमा ओलांडून शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
देशाची आर्थिक विचारसरणी आणि धोरणनिर्मितीमध्ये या विभागातील विद्वानांचा मोठा वाटा आहे. प्रा. सी. एन. वकील, प्रा. एम. एल. दांतवाला, प्रा. डी. टी. लकडावाला आणि प्रा. पी.आर. ब्रम्हानंद यांनी या विभागाचाच नव्हे तर देशातील अर्थशास्त्र अभ्यासाचा पाया रोवला. या स्वायत्त विभागातील माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर देश-विदेशात नावलौकिक कमावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युटीआय, सेबी, युनिसेफ, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, योजना आयोग आणि भारत सरकारचे विविध विभाग यासह विविध नामांकित आणि शैक्षणिक संस्थामध्ये या विभागातील विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले असून ही प्रक्रिया अविरत सुरुच आहे.