राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० पुण्यातील बारामती येथे झाला. शरद गोविंदराव पवार हे त्यांचे पूर्ण नाव. शरदजींचे वडील गोविंदराव पवार हे बारामती शेतकरी सहकारी बँकेत कामाला होते. तर आई आई शारदाबाई पवार या उत्तम गृहिणी असण्याबरोबरच राजकारणीही होत्या. बारामतीमधील सरकारी शाळेतून शरद पवार यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
१ ऑगस्ट १९६७ रोजी प्रतिभा शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून खासदार आहेत.
शरद पवार नव्हे तर आई ‘शारदाबाई’ पवार घराण्यातील पहिल्या राजकारणी :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्या आई ‘शारदाबाई पवार अशी त्यांची अनेकजण ओळख सांगत असले, तरी ती त्यांची सुरुवातीची ओळख नव्हे. कारण शारदाबाई पवार या स्वतंत्र ओळखीच्या कर्तृत्वाच्या व्यक्ती होत्या. १२ डिसेंबर हा शरद पवार आणि त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्मदिवस. १२ डिसेंबर १९११ मध्ये कोल्हापुरातील पन्हाळगड जवळच्या गोलिवडे गावातल्या कृष्णराव भोसले आणि लक्ष्मीबाई भोसले या दाम्पत्याच्या पोटी शरदबाईंचा जन्म झाला. त्याकाळी सातवीपर्यंत शिकलेल्या शारदाबाईंनी इच्छाशक्तीच्या बळावर २६-२७ व्या वर्षी राजकारणात उतरल्या. १९३८ च्या जूनमध्ये शारदाबाईंनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. पुढे सलग १४ वर्षे त्या लोकल बोर्डाच्या (लोकल बोर्ड म्हणजे आजच्या काळातील जिल्हा परिषदेचं रूप) सदस्य होत्या. विशेष म्हणजे, पुणे लोकल बोर्डात एवढी वर्षे त्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्यामुळे, शरद पवार नव्हे, तर शारदाबाई या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी होत.
कॉलेजमध्येच शरद पवारांचा राजकारणात प्रवेश :
शरदचंद्र पवार यांनी शिक्षण सुरू असतानाच राजकारणात प्रवेश केला होता. कॉलेजमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि सरचिटणीस बनले. यानंतर शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव यांनी शरद पवारांची योग्यता आणि राजकारणातील रस ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले.
४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री :
१९६७ साली शरद पवार यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी १९७२ आणि १९७८ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या. शरद पवार १९७८ मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर १९८८, १९९० आणि १९९३ मध्ये ते मुख्यमंत्री राहिले. शिवाय, शरद पवार यूपीए आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.
काँग्रेसपासून वेगळे होऊन स्वत:चा पक्ष स्थापन :
१९९९ मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. खरे तर या तिघांनीही पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे देण्यावर आक्षेप घेतला होता. यानंतर २५ मे १९९९ रोजी शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. असे असले तरीही शरद पवार यांचा पक्ष विभक्त होऊनही यूपीएचा एक भाग राहिला.