याबाबत विधान परिषद सदस्य विक्रम काळे, कपिल पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्य सरकारकडून शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी १० हजार ६४३ शाळा पात्र ठरल्या आहेत. यापैकी ८८२१ शाळांना अनुदान देण्यात आले असून, या अनुदान १८२२ शाळा अपात्र ठरल्या आहेत.आवश्यक कागदपत्रे न दिल्याने या शाळा अपात्र ठरल्या असून, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पात्र शाळांना टप्प्या टप्प्याने २० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत येत्या चार वर्षांत अनुदान दिले जाईल. मात्र त्यानंतर कोणत्याही नवीन शाळेला अनुदान दिले जाणार नाही. राज्यात केवळ सरकारी, अनुदानित आणि खासगी या तीनच प्रकारच्या शाळा उरतील.
एनर्जी पार्कसाठी २० कोटी :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने टेक्नॉलॉजी ॲँड एनर्जी पार्क उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनातर्फे २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानपरिषदेत भाई जगताप, जयंत आसगावकर आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मंत्र्यांनी ही माहिती दिली. या पार्कसाठी विद्यापीठाने ५६.१९ कोटींचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची किंमत ४४.१२ कोटी इतकी निश्चित करण्यात आली. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने त्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. वित्त विभागाकडून २९ नोव्हेंबर रोजी २० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
पवित्र पोर्टल १५ दिवसांत :
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते बंदच आहे. पुढील पंधरा दिवसांत ते सुरू होईल, अशी माहिती यावेळी केसरकरांनी दिली. त्यासाठी लागणारा डेटा सरकारकडे गोळा झाला आहे. तातडीने हे पोर्टल सुरू केले जाईल.