हायलाइट्स:
- घरफोडीच्या घटनेनं जिल्ह्यातील नागरिक हैराण
- अखेर पोलिसांनी महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या
- चोरी केलेले साहित्य पोलिसांनी केलं जप्त
कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी गोडाऊन आणि घरांना लक्ष्य करत चोऱ्या करणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी महिलांकडून सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं चंदवानी सिरॅमिक दुकान आहे. या परिसरात त्यांचे गोडाऊनदेखील आहे. १६ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. तसंच गोडाऊनमधील सॅनिटरी वेअरच सिरॅमिक्स आणि ब्रास मेटल असे सुमारे ७ लाख १३ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी माहिती दिली.
या प्रकरणी दिलीप चंदवानी यांनी शाहूपूरी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, कॉन्स्टेबल राहुल कांबळे करत होते.
गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती काढून शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने मंगल गोसावी, कमल गोसावी, बायनाबाई गोसावी, सुरेखा गोसावी यांच्यासह ८ महिलांना वडणगे परिसरातील गोसावीवाडी येथून अटक केली. आरोपी महिलांनी चोरी केलेले साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.
दरम्यान, या महिलांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोर्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या दृष्टीने शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.