राज्यपाल रमेश बैस यांच्या वक्तव्यानंतर लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी; तसेच त्यांचे आरोग्य हे उत्तम राहण्यासाठी, सकाळी शाळा नको, असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गुरुवारी व्यक्त केले. याला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून, पालकांकडूनही त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. या विषयाबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. ‘शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लहान मुलांची झोप पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मेंदूचा विकास हा झोपेशी निगडित आहे. अशावेळी सकाळी सातला शाळा असल्यामुळे, त्यांची झोप पूर्ण होत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा ठरला. मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणातही लक्ष लागत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, शाळांच्या वेळेतील हा बदल पालकांसाठी एक आनंदाचा ठरला आहे.
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षाच्या पुढे तर, प्राथमिक शाळा मधील मुलांचे वय ३ ते १० वर्षे असते. त्यामुळे, प्राथमिक शाळांची वेळ दुपारी तर, माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरायला हव्यात अशी सूचना देखील शिक्षण मंत्र्यांनी केलेली आहे.
त्यामुळे, आता या शाळेच्या वेळांमध्ये बदल होणार आहेत. सध्या, दुसरीपर्यंतची शाळा सकाळी उशिरा भरवण्यात येणार आहे तर इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
शाळांची वेळ बदलनार असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागातील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरा उशिरापर्यंत जागी असतात, त्यामुळे मुले ही रात्री उशिरापर्यंत जागीच असतात या कारणांनी मुलांची झोप पूर्ण होत नाही.
या वेळांमध्ये भरणार शाळा :
सध्या सकाळच्या सत्रातील शाळा ७ वाजताच्या आसपास भरत असल्यामुळे कमीत कमी ही वेळ ९ पर्यंत पुढे नेल्यास किमान मुलांची झोप पूर्णपणे होऊ शकते. तसेच पालकांची देखील धावपळ कमी होते त्यामुळे हा जो निर्णय आहे तो अत्यंत योग्य आहे. इतर इयत्तांच्या वेळेबाबत अंतिम निर्णय हा लवकरच घेतला जाईल, असे देखील दीपक केसकर यांनी म्हटले आहे.