नारायण राणेंना योद्ध्याची उपमा; ‘हे’ ट्वीट राज्यभर चर्चेत

हायलाइट्स:

  • नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरू
  • रत्नागिरी जिल्ह्यात लोकांशी संवाद साधणार
  • माजी खासदार नीलेश राणे यांचं ट्वीट चर्चेत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर त्यांची जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती. स्थगित करण्यात आलेली ही यात्रा आजपासून पुन्हा सुरू होतेय. त्या निमित्तानं माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबईतून त्यांनी ही जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना हेच त्यांचं लक्ष्य होती. प्रत्येक ठिकाणी राणे हे ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवत होते. महाड इथं पत्रकार परिषदेला संबोधित करताना मात्र त्यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांना अटकही झाली. या घटनाक्रमामुळं जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती. ती आज रत्नागिरीतून सुरू होत आहे.

वाचा:अमिताभ यांच्या पोलीस बॉडीगार्डची तडकाफडकी बदली; ‘हे’ आहे कारण

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार नीलेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. नीलेश यांनी नारायण राणे यांचा मोदी यांच्यासोबतचं पोस्टर ट्वीट केलं आहे. त्यात राणे यांना योद्ध्याची उपमा देण्यात आली आहे. ‘योद्धा पुन्हा मैदानात…’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेविरुद्धचा संघर्ष सुरूच राहणार हे संकेतच या ट्वीटमधून देण्यात आले आहेत.
अटक प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसंच, आपल्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना इशाराही दिला होता. आजच्या जन आशीर्वाद यात्रेत ते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा: एक आठवण! ‘ते’ पोस्टर ट्वीट करत नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Source link

narayan rane news todayNarayan Rane's Jan Ashirwad YatraNilesh Rane News TodayNilesh Rane's Latest Tweetजन आशीर्वाद यात्रानारायण राणेनीलेश राणे
Comments (0)
Add Comment