ओकोरी इमॅन्युअल ब्राईट (३३) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून तो नायजेरियन देशाचा नागरिक असल्याची माहिती वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.
ठाणे पूर्वेकडील आनंदनगर चेकनाका येथील बस पार्किंगजवळ एक नायजेरियन नागरिक कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घोडके यांना मंगळवारी मिळाली होती. या माहितीनंतर सायंकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ओकोरी याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून ३१ ग्रॅम कोकेन हस्तगत केले. य़ा कोकोनची किंमत १२ लाख ४० हजार आहे. नालासोपारा येथे वास्तव्यास असलेला ओकोरी याने त्याच्या साथीदाराकडून कोकेन घेऊन ठाण्यात विक्रीसाठी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी हा कोकेन कोणाला विक्री करणार होता याची चौकशी पोलिस करीत आहेत. मात्र, नववर्ष स्वागताला केवळ अकरा दिवस शिल्लक असले तरी ठाण्यात मिळालेल्या लाखो रुपयांच्या अमली पदार्थांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत.
नववर्ष स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केले जात असून या पार्ट्य़ांमध्ये अंमली पदार्थांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नववर्षाच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांकडून विशेष मोहिम राबवण्यात येत असून पार्ट्यांवरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. पार्ट्यांमध्ये कोणी अमली पदार्थांची विक्री करण्य़ाचा प्रयत्न करीत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, पोलिस हवालदार रोहिदास रावते, सुनिल निकम यांच्या पथकाने केली.
गतवर्षी २७ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
नववर्ष स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्यांच्या अनुषंगाने गेल्या वर्षी देखील गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने अंमली पदार्थ विरोध मोहिम राबवली होती. या मोहिमेमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आले होते. तसेच, त्यांच्याकडून २७ लाख ६७ हजार २५० रुपयांचा ६० ग्रॅम कोकेन आणि ७० ग्रॅम मेफोड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक घोडके यांनी दिली.
नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने आमच्या पथकाकडून पोलिस आयुक्तालयानं गस्तीमध्ये वाढ केली आहे. पार्ट्यांवरही आमचा विशेष वॉच असल्याचे ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News