मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देण्यास आले होते. त्यानंतर यंदाची ही त्यांची दुसरी भेट ठरली. यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना पुष्पार्पण करत अभिवादन केले. त्यानंतर संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांच्यासोबत त्यांची जवळपास वीस मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. संघाद्वारे त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ भेट स्वरूपात देण्यात आले. त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले, भाजपचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते हेदेखील उपस्थित होते.
पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही? बच्चू कडूंचा संघ आणि भाजपला सवाल
राज्यासह देशात पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही, असा सवाल प्रहार पक्षाचे प्रमुख आणि सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धीमध्यमांशी बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी जातिगत जनगणनेला विरोध केला होता. त्यावर विरोधकांनीही संघ आणि भाजपवर चांगलीच टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी त्यावर भाष्य करतांना म्हटले की, जातिगत जनगणना व्हायलाच पाहिजे. त्याला आमचे (प्रहार पक्षाचे) समर्थन असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्याने कोणत्या समाजाचा लोकसंख्येत किती वाटा आहे, हे स्पष्ट होईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जारांगे पाटील यांनी आता पुन्हा आंदोलन केल्यास मी कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी होईल. शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळायलाच हवा. विदर्भाच्या प्रश्नावर केवळ एक तास चर्चा होणे योग्य नाही. त्याने विदर्भाला न्याय मिळू शकत नसल्याचेही कडू म्हणाले.