हायलाइट्स:
- एकनाथ खडसेंच्या मालमत्तेवर टाच
- ५ कोटींची मालमत्ता जप्त
- अंजली दनामियांची केलं सूचक ट्वीट
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ५ कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) जप्त केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईमुळं एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना व राज्यात मंत्री असताना भोसरी एमआयडीसी भूखंड गैरव्यवहार प्रकरण पुढं आलं होतं. ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून ईडीनं एकनाथ खडसेंना तब्बल ९ तास चौकशी केली होती. आता याच प्रकरणात ईडीने खडसेंची कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केलं आहे.
एकनाथ खडसेंची कोट्यवधींची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
अंजली दमानिया आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, एकनाथ खडसे यांची ५ कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ५ कोटी म्हणजे काहीच नाही अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे ईडीला. खरंतर असे अनेक खडसे प्रत्येक पक्षात आहे. सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
फडणवीस सरकारच्या काळात महसूलमंत्री असताना खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे ३ एकर एमआयडीसी भुखंड खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या भूखंडाची किंमत ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक असताना या भूखंडाची विक्री ३. ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केला असून हा व्यवहार खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावे करण्यात आला होता, असंही तक्रारीत नमूद केलं होतं.
‘भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवला’